
इस्लामाबाद , 31 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी गुरुवारी (दि.३०) सांगितले की, पाकिस्तान सर्व शेजारी देशांसोबत शांतता राखू इच्छितो, परंतु सीमेपलीकडून होणारा दहशतवाद अजिबात सहन केला जाणार नाही. मुनीर हे पेशावरमध्ये कबायली वयोवृद्ध नेत्यांच्या ‘जिरगा’ (परिषद) बैठकीत बोलत होते. त्याआधी ११ व्या कोर मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान त्यांना देशातील सध्याच्या सुरक्षा परिस्थिती, लष्करी तयारी, तसेच पाकिस्तान-अफगाण सीमेवरील शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सुरू असलेल्या कारवायांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सेनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मुनीर यांनी पाकिस्तान आणि अफगाण तालिबान यांच्यात अलीकडे निर्माण झालेल्या तणावाच्या काळात कबायली लोकांनी दिलेल्या निःस्वार्थ आणि ठाम समर्थनाचे कौतुक केले. त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लोकांच्या शौर्य आणि बलिदानाचेही अभिनंदन केले. कबायली वयोवृद्ध नेत्यांनी देखील दहशतवाद आणि अफगाण तालिबानविरुद्ध लष्कराला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. मुनीर म्हणाले, “पाकिस्तानला अफगाणिस्तानसह सर्व शेजाऱ्यांसोबत शांततेचे संबंध ठेवायचे आहेत. मात्र, शेजारी देशाच्या भूमीचा वापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी होऊ नये.” त्यांनी स्पष्ट केले की, अफगाणिस्तानकडून सीमा ओलांडून दहशतवादी कारवाया सुरू असूनही पाकिस्तानने संयम राखला आहे. पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी काबुलला अनेक राजनैतिक आणि आर्थिक प्रस्ताव दिले आहेत.
मुनीर यांनी कबायली वयोवृद्धांना आश्वासन दिले की “पाकिस्तान, विशेषतः खैबर पख्तूनख्वा प्रांत, दहशतवाद्यांपासून आणि त्यांच्या समर्थकांपासून पूर्णपणे मुक्त केला जाईल.” कबायली नेत्यांनी लष्करप्रमुखांना पाठिंबा दर्शवून शांततेसाठी आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.मुनीर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला करून एका कॅप्टनसह सहा सैनिकांचा बळी घेतला. त्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई करत १८ दहशतवाद्यांना ठार केले. हा हल्ला अफगाणिस्तानसोबतच्या शांतता चर्चेचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode