
मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाचा (आयपीओची ) किंमत श्रेणी जाहीर केली असून या इश्यूद्वारे कंपनी तब्बल ७,२७८ कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ ३१ ऑक्टोबर रोजी खुला होणार असून ४ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. कंपनीने प्रती शेअर किंमत श्रेणी ३८२ ते ४०२ रुपये अशी निश्चित केली आहे. किमान ३७ शेअर्सचा एक लॉट ठेवण्यात आला असून त्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १४,८७४ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एकूण इश्यूमधील फक्त १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
या आयपीओचे वाटप ६ नोव्हेंबरला होण्याची शक्यता असून ७ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. लेन्सकार्टचे शेअर्स १० नोव्हेंबर रोजी एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध होतील. सर्वोच्च किंमतपट्ट्याच्या आधारे कंपनीचे एकूण मूल्य सुमारे ७०,००० कोटी रुपये इतके ठरणार आहे. पियूष बन्सल यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी २,१५० कोटी रुपये नव्या शेअर्सच्या इश्यूमधून उभारणार असून १२.७५ कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. या ऑफर फॉर सेलद्वारे सॉफ्टबँक व्हिजन फंड, केदार कॅपिटल, टीआर कॅपिटल आणि चिराटे व्हेंचर्स यांसारखे गुंतवणूकदार आपला हिस्सा कमी करणार आहेत.
दरम्यान, डिमार्टचे मालक राधाकिशन दमाणी यांनी आधीच ९० कोटी रुपयांची गुंतवणूक करून या इश्यूकडे बाजाराचे लक्ष वेधले आहे. कंपनीच्या मते, नव्या शेअर्सच्या इश्यूमधून मिळणारी रक्कम प्रामुख्याने भारतातील कंपनी-स्वामित्वाच्या (सीओसीओ) स्टोअर्ससाठी भाडे आणि लीज देयकांवर वापरली जाणार आहे. यासाठी तब्बल ५९१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच ३२० कोटी रुपये मार्केटिंग आणि व्यवसायवृद्धीसाठी तर २७६ कोटी रुपये नव्या सीओसीओ स्टोअर्सच्या उभारणीसाठी वापरले जातील. तंत्रज्ञान आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणुकीसाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामकाजासाठी वापरली जाईल.
या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया, अवेंदस कॅपिटल, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, अॅक्सिस कॅपिटल आणि इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस म्हणून काम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule