ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांचे निधन
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांचे मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी देगलूर (जि. नांदेड) येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर देगलूर येथील कद्रेकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
बाबू बिरादार


नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांचे मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी देगलूर (जि. नांदेड) येथे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर देगलूर येथील कद्रेकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय 75 वर्षे होते. आज दुपारी चार वाजता धनगरवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

बाबू बापूराव बिरादार असे त्यांचे पूर्ण नाव आहे त्यांच्या मागे दोन पत्नी राधाबाई आणि शाहूबाई, चार मुले, चार मुली असा परिवार आहे.

देगलूर तालुक्यातील 'काठेवाडी' हे त्यांचे मूळ गाव. मात्र, ते त्यांच्या मामाच्या गावी धनगरवाडी येथे स्थायिक झाले होते.

गावात राहून त्यांनी ही लिखाण केले. मराठी सह उर्दू, कानडी, तेलगू, हिंदी या भाषा बोलणाऱ्या प्रदेशात राहून त्यांनी मराठी भाषेत लिखाण करून आपला नावलौकिक मिळविला होता. अनेक पुरस्कार, संमेलनाध्यक्ष, परिसंवाद, व्याख्याने, परीचर्चा यात त्यांना अनेक मान सन्मान मिळाले.

बाबू बिरादार यांनी मातीखालचे पाय, कावड, गोसावी,अग्निकाष्ठ, अंत:पुरूष, संभूती अशा दमदार कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ते ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. जिल्हा सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा करून ते निवृत्त झाले होते. अत्यंत मोकळाढाकळा स्वभाव, गप्पांच्या मैफलीत मनापासून रमणारा, बोलताना आपला देगलुरी ढाचा किंचितही बिघडू न देणारा हा मनस्वी कलावंत होता.

'मातीखालचे पाय' ही त्यांची पहिली कादंबरी. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेद्वारे ती प्रसिद्ध झाली. ज्येष्ठ कवी आणि अनुवादक भगवंत क्षीरसागर आणि विख्यात चित्रकार भ. मा. परसवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगाती प्रकाशनाकडून १९८२ मध्ये ही कादंबरी आली. आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमारेषेवरील वाडी या छोट्याशा गावातील संभाच्या कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी या कादंबरीत आलेली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात साहित्यिकांनी आदरांजली अर्पण केली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande