
पॅरिस, 29 ऑक्टोबर (हिं.स.)पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्पेनचा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू कार्लोस अल्कारजची विजयी मालिका संपुष्टात आली आहे. अल्काराझ दुसऱ्या फेरीत बिगरमानांकित कॅमेरॉन नूरीकडून पराभूत झाला. अल्कारजने पहिला सेट जिंकला होता. पण त्यानंतर नूरीने पुढचे दोन्ही सेट जिंकून सामना ४-६, ६-३, ६-४ असा जिंकला. मी माझ्या खेळाने खरोखर निराश आहे. मला बरे वाटत नव्हते आणि मी खूप चुका केल्या, असे सामन्यानंतर अल्कारज म्हणाला.
सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेत्याने दुसरा सेट गमावल्यानंतर प्रशिक्षक जुआन कार्लोस फेरेरो यांच्याशी परिस्थितीबद्दल चर्चा केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. या पराभवामुळे मास्टर्स स्पर्धांमध्ये अल्कारजची १७ सामन्यांची विजयी मालिकाही संपुष्टात आली. इतकेच नाही तर तो त्याचे अव्वल क्रमांकाचे रँकिंग देखील गमावू शकतो कारण जर दुसऱ्या क्रमांकाचा यानिक सिनरने ही स्पर्धा जिंकली तर तो एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचणार आहे.
या हंगामात अल्कारजने आठ विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन तसेच तीन मास्टर्स स्पर्धांचा समावेश आहे. नूरीचा पुढील सामना व्हॅलेंटाईन वाचेरोट आणि आर्थर रिंडरक्नेच यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. वाचेरोटने पहिल्या फेरीत १४ व्या मानांकित जिरी लेहेकाचा ६-१, ६-३ असा पराभव केला. पाचव्या मानांकित बेन शेल्टनने फ्लेव्हियो कोबोलीचा ७-६ (४), ६-३ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना आंद्रे रुबलेव्हशी होईल. नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अलियासिमे आणि ११ व्या मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनीही विजय मिळवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे