
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीतील आयुष रायकर, निधी मुळ्ये या दोघांची राज्य अजिंक्यपद बुद्धबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा परिषद, व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सातारा चेस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात नुकत्याच कोल्हापूर विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. १४ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलमधील सहावीतील विद्यार्थी आयुष रायकरने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्वतः बिगरमानांकित असलेल्या आयुषने स्पर्धेत एकूण पाच फिडे मानांकित खेळाडूंचा पराभव केला. पहिल्यांदाच विभागीय स्पर्धेत सहभागी होत असूनदेखील आयुषने राज्यस्तरावर धडक मारली आहे.
१७ वर्षांखालील वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील नववीत शिकणाऱ्या निधी मुळ्येने सहा फेऱ्यांमध्ये साडेचार गुणांसह तृतीय स्थान पटकावले. निधीने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत तीन सामने जिंकले व तीन बरोबरीत सोडवले. पंधरावे मानांकन असलेल्या निधीने स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंविरुद्ध चांगली लढत दिली.
आयुष व निधी रत्नागिरीतील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमध्ये बुद्धिबळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात. सातारा येथेच १२ ते १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोघेही रत्नागिरी जिल्ह्याचे विभागातर्फे प्रतिनिधित्व करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी