पिंपरी चिंचवडमध्ये होणार आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप
पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व लिहिणारा क्षण नोव्हेंबरमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये साकारत आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन होत असून, हा भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळा १ ते ४ न
पिंपरी


पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व लिहिणारा क्षण नोव्हेंबरमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये साकारत आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन होत असून, हा भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळा १ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील अत्याधुनिक स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे.

ही स्पर्धा इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन (IMF), पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या चार दिवसांच्या स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० युवा खेळाडू सहभागी होणार असून, स्पीड क्लाइंबिंग, लीड क्लाइंबिंग आणि बोल्डरिंग या तीन थरारक प्रकारांमध्ये १३ आणि १५ वयोगटातील मुले-मुली आपले कौशल्य प्रदर्शित करतील.

प्रत्येक भिंतीवरील चढाई ही केवळ वेग आणि कौशल्याचीच नाही, तर मानसिक एकाग्रतेची आणि धैर्याचीही परीक्षा ठरणार आहे. स्पर्धेचे परीक्षण IMF व IFSC कडून नियुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे न्यायाधीश आणि मार्गरचनाकार (Route Setters) करतील, ज्यामुळे स्पर्धेतील सर्व निकष जागतिक दर्जाचे राहतील.

ही स्पर्धा ज्या कॉम्प्लेक्समध्ये पार पडणार आहे, तो महाराष्ट्रातील गिर्यारोहण व अ‍ॅडव्हेंचर क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ – सुरेंद्र शेळके, श्रीकृष्ण कडुसकर आणि सागर पालकर – या त्रयींच्या कल्पकतेतून उभा राहिला आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मिशनच्या सहकार्याने उभारलेले हे अत्याधुनिक केंद्र सध्या देशातील सर्वाधिक प्रगत क्रीडासुविधांपैकी एक मानले जाते.

या माध्यमातून भारतातून ऑलिंपिक स्तरावरील क्लाइंबिंग खेळाडू घडविण्याचे स्वप्न एमएससीए ने साकारले आहे. “मिशन ऑलिंपिक २०३६” च्या दिशेने हा एक निर्णायक टप्पा ठरेल. गेली दोन दशके या त्रयीने महाराष्ट्रात क्लाइंबिंग संस्कृती रुजवली आहे. अण्णासाहेब मागर स्टेडियम (चिंचवड) आणि राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल (शिवाजीनगर) येथे झालेल्या यशस्वी प्रयत्नांनंतर या जागतिक दर्जाच्या कॉम्प्लेक्सपर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्ण झाला आहे.

अलीकडेच ऑक्टोबर २०२५ मध्ये पार पडलेल्या २९ व्या IMF वेस्ट झोन स्पोर्ट क्लाइंबिंग चॅम्पियनशिपने या केंद्राची गुणवत्ता आणि MSCA च्या स्वयंसेवकांची तयारी सिद्ध केली आहे. या अनुभवावर आधारित, आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन अधिक भव्य व दर्जेदार होणार आहे.

हा रोमांचक कार्यक्रम MSCA च्या अधिकृत YouTube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच MSCA, IMF, IFSC Asia आणि PCMC च्या ऑनलाइन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत अपडेट्स शेअर केले जातील.

या सोहळ्याद्वारे भारताला स्पोर्ट क्लाइंबिंगच्या जागतिक नकाशावर एक विशेष स्थान प्राप्त होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande