न्यूझीलंडची दुसऱ्या वन-डेत इंग्लंडवर ५ विकेट्सने मात
वेलिंग्टन, २९ ऑक्टोबर (हिं.स.). इंग्लंडची कमकुवत फलंदाजी पुन्हा एकदा संघासाठी महागात पडली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ विकेट्सने पराभव करून मालिका २-० ने जिंकली.२००८ नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने घरच
ब्लेअर टिकनर


वेलिंग्टन, २९ ऑक्टोबर (हिं.स.). इंग्लंडची कमकुवत फलंदाजी पुन्हा एकदा संघासाठी महागात पडली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ विकेट्सने पराभव करून मालिका २-० ने जिंकली.२००८ नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने घरच्या मैदानावर इंग्लंडचा एकदिवसीय मालिकेत पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना १ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला केवळ १७५ धावाच करता आल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना डॅरिल मिशेल (५६), रचिन रवींद्र (५४) आणि मिशेल सँटनर (३४) यांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने केवळ ३३.१ षटकांत लक्ष्य पार केले. २००८ नंतर न्यूझीलंडचा घरच्या मैदानावर इंग्लंडवर पहिलाच एकदिवसीय मालिका विजय आहे.

न्यूझीलंडच्या सर्व सहा गोलंदाजांनी विकेट घेतल्या. तर ब्लेअर टिकनरने शानदार गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या. नॅथन स्मिथने दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन (४२) आणि हॅरी ब्रूक (३४) यांनी आश्वासक खेळ केला. कर्णधार जोस बटलर आणि जो रूट स्वस्तात बाद झाले.

पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा इंग्लंड सुरुवातीपासूनच अडचणीत सापडले. जेकब डफीने तिसऱ्या षटकात बेन डकेटला बाद केले आणि त्यानंतर लगेचच फॉल्क्सने सलामीवीर जेमी स्मिथला बाद केले. टिकनरने जो रूटला बाद करून इंग्लंडला तिसरी विकेट मिळवून दिली. एका बाजूला विकेट पडणे सुरूच राहिले आणि संघ ३६ षटकात १७५ धावांवर आटोपला.

लक्ष्याचा पाठलाग करताना जोफ्रा आर्चरने पहिल्या षटकात विल यंगला बाद केल्याने न्यूझीलंडची सुरुवात डळमळीत झाली होती. पण रचिन रवींद्र (५४) आणि डॅरिल मिशेल (नाबाद ५६) यांनी डाव सावरला. रवींद्रने ५४ धावांची शानदार खेळी केली, तर मिशेलने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.

इंग्लंडकडून आर्चरने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या (३/२३), पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटी मिचेल सँटनर (३४ नाबाद, १७ चेंडू) यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि ३३.१ षटकांत सामना संपवला. ब्लेअर टिकनरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande