महिला क्रिकेट विश्वचषक : भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट
नवी मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.) नवी मुंबईत होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असूनही भारताला कांगारुंच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ कर्णधार


नवी मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.) नवी मुंबईत होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असूनही भारताला कांगारुंच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वी दोन्ही संघ गट टप्प्यातील सामन्यात भिडले होते. या सामन्यात अव्वल क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियन संघाने विक्रमी लक्ष्याचा पाठलाग केला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या भारताचा तीन विकेट्सने पराभव केला होता.विशाखापट्टणममध्ये शानदार शतक झळकावणारी आणि सामनावीर म्हणून निवडलेली एलिसा हीली दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियासाठी शेवटच्या दोन गट सामन्यात खेळू शकली नव्हती. उपांत्य फेरीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा सहभाग अनिश्चित आहे.

भारतीय सलामीवीर प्रतीका रावल उपांत्य फेरी आणि उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. गेल्या आठवड्यात बांगलादेशविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना तिला घोट्याला दुखापत झाली होती.२५ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूची अनुपस्थिती हरमनप्रीत कौर अँड कंपनीसाठी मोठा धक्का असेल, कारण रावल २०२५ च्या महिला क्रिकेट विश्वचषकात सलामीवीर स्मृती मानधनानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू आहे.रावलच्या जागी शेफाली वर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. तर अमनजोत कौर, हरलीन देओल, उमा छेत्री आणि जेमिमा रॉड्रिग्ज हे मंधानासोबत वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी पर्याय आहेत.

आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या ६० पैकी ४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर भारताने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. २००५ च्या अंतिम सामन्यासह १० सामने जिंकले आहेत. भारताने फक्त तीन वेळा विजय मिळवला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

गुरुवारी नवी मुंबईत पावसाची शक्यता आहे. उपांत्य फेरीचा कालावधी मूळ वेळेपेक्षा १२० मिनिटांपर्यंत वाढवता येऊ शकतो, जो गट टप्प्यात ६० मिनिटांचा होता. दुसऱ्या दिवशी अतिरिक्त राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. निकालासाठी दोन्ही संघांना किमान २० षटके फलंदाजी करण्याची संधी असणे आवश्यक आहे. जर नियोजित दिवशी हे शक्य नसेल, तर राखीव दिवशी एकाच वेळी खेळ पुन्हा सुरू होईल.राखीव दिवसानंतर कोणताही निकाल न लागल्यास, ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार आहे. कारण त्यांचा संघ गट टप्प्यात पहिल्या स्थानावर होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande