
रावळपिंडी, २९ ऑक्टोबर (हिं.स.) सलामीवीर रीझा हेंड्रिक्स आणि वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉश यांच्या दमदार कामगिरीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा ५५ धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ९ बाद १९४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १३९ धावांवर आटोपला.
हेंड्रिक्सने क्विंटन डी कॉक (२३ धावा, १३ चेंडू) सोबत संघाला वेगवान सुरुवात करुन दिली. त्यानंतर, पदार्पण करणाऱ्या टोनी डी जॉर्गीने १६ चेंडूत ३३ धावा केल्या, तर अष्टपैलू जॉर्ज लिंडेने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने शानदार गोलंदाजी केली आणि ४ षटकांत ३ विकेट्स घेत२६ धावा दिल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरचा फलंदाज सॅम अयुबने २८ चेंडूत ३७ धावा केल्या. पण इतर फलंदाजांना लय सापडली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरनंतर पहिलाच टी-२० सामना खेळणारा कर्णधार बाबर आझम दोन चेंडूंनंतर शून्यावर बाद झाला. बॉशच्या गोलंदाजीवर हेंड्रिक्सने त्याचा झेल पकडला. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना शुक्रवारी लाहोरमध्ये खेळला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे