नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।भोकर येथे बांधकाम सुरु असलेल्या श्री संत सेवालाल महाराज स्मारकाच्या भूखंडावरील खासगी व्यक्तींचा दावा भोकर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.या निर्णयामुळे या स्मारकाच्या मार्गात अडथळा आणण्याचे प्रयत्न उधळले गेले आहेत. अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
या स्मारकाच्या माध्यमातून बंजारा समाजाची एक महत्वपूर्ण मागणी मार्गी लागत असताना त्यात अडथळा निर्माण करण्याचे राजकीय षडयंत्र रचण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे हे कारस्थान उधळले गेले. हे स्मारक मंजूर करताना आम्ही कागदोपत्री सर्व प्रकारची काळजी घेतली होती. हे स्मारक नगर परिषदेच्याच जागेत असून, न्यायालयात शेवटी सत्याचा विजय झाला. श्री संत सेवालाल महाराजांचे स्मारक पूर्ण करून त्याचे लोकार्पण करणे हे माझे स्वप्न असून, ते पूर्णत्वास आल्याशिवाय राहणार नाही, याचा मला ठाम विश्वास आहे.असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis