पुरग्रस्त खळी गावात डॉक्टर असोसिएशनचे आरोग्य शिबीर
परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे गोदाकाठच्या गावांना वेढा बसला होता. तालुक्यातील अनेक जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. गावात येणाऱ्या फरशी प्लॉटचा पूल आणि सोडेवरील ओढ
पुरग्रस्त खळी गावात डॉक्टर असोसिएशनचे आरोग्य शिबीर संपन्न


परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे गोदाकाठच्या गावांना वेढा बसला होता. तालुक्यातील अनेक जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. गावात येणाऱ्या फरशी प्लॉटचा पूल आणि सोडेवरील ओढ्याचा पूल पाण्याखाली गेल्याने खळी गाव पूर्णपणे अलगद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेडचे सभासद व वैद्यकीय अधिकारी शिबीरासाठी खळी गावात दाखल झाले आणि पुरग्रस्त रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेड, जि. परभणी यांच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त खळी (ता. गंगाखेड) येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्याचा संदेश दिला.

या शिबिरात डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. पी. गारोळे (पोट विकार तज्ञ) यांच्यासह डॉ. मणिष बियाणी (अस्थिविकार तज्ञ), डॉ. श्रीहरी धापसे (बालरोग तज्ज्ञ), डॉ. फेरोज शेख (त्वचारोग तज्ज्ञ), डॉ. महेश शिंदे (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. अमित उगीले (भूलतज्ज्ञ), डॉ. पाराजी सोळंके (कान-नाक-घसा तज्ज्ञ) तसेच जनरल फिजिशियन म्हणून डॉ. किशोर कुगणे, डॉ. बाळासाहेब मानकर, डॉ. कलिम खान, डॉ. रितेश वट्टमवार, डॉ. भरत भोसले, डॉ. ज्ञानोबा तूरनर आणि डॉ. अनिल बर्वे उपस्थित होते. त्यांना तांत्रिक स्टाफसह मावली करवर, धारासूर केंद्राचे पवार साहेब, एम.पी.डब्ल्यू. सहाय्यक रामभाऊ लटपटे, सिस्टर बन मॅडम तसेच वर्कर अशाताई सोन्नर, मंदाकिनी सोन्नर व सहकारी यांनी मोठी साथ दिली.

आरोग्य शिबिरात तपासणीसाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, पोटाचे विकार, स्त्रियांचे विकार, ताप, सर्दी-खोकला, सांध्याचे विकार या आजारांचे रुग्ण प्रमुख होते. एकूण ५५० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यामध्ये पोट विकाराचे ७५, जनरल मेडिसीन २००, स्त्रीरोग ५०, अस्थिविकार ६०, त्वचारोग ५०, कान-नाक-घसा ४०, बालरोग ५० आणि इतर २५ रुग्णांचा समावेश होता.

शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर गावकऱ्यांच्या वतीने डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. पी. गारोळे व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खळी गावचे खरे आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे ज्ञानेश्वर घुलेश्वर यांचा विशेष सत्कार डॉ. गारोळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे खळी गावातील पुरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेडच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande