
- 'तुका म्हणे, कहे कबीरा' मैफलीतून तुकाराम-कबीरांच्या विचारांचा संगीत संवाद
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जगताला नवी दिशा देणारे दोन महान संत, संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या विचारांना संगीताच्या माध्यमातून एकत्र आणणारा एक अभूतपूर्व कार्यक्रम राजधानी दिल्लीत सादर होणार आहे. पंचम निशाद संस्थेकडून आयोजित 'तुका म्हणे, कहे कबीरा' ही विशेष संगीत मैफल गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी, सायंकाळी 6 वाजता, कमानी सभागृह, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.
सगुण आणि निर्गुणाचा समन्वय
सगुण भक्तीचे प्रतीक असलेल्या संत तुकारामांचे अभंग आणि निराकार, निर्गुण तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते संत कबीरांचे दोहे, या दोन भिन्न भक्तीधारांना एकाच मंचावर आणण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. प्रसिद्ध गायिका रंजनी-गायत्री तुकारामांची भावपूर्ण अभंगवाणी सादर करतील, तर गायक भुवनेश कोमकळी कबीरांच्या गहन कबीरवाणीचे सादरीकरण करतील. या दोन महान संतांच्या विचारांमधील मूलभूत एकता आणि 'सत्याचा शाश्वत शोध' या समान उद्देशावर हा कार्यक्रम प्रकाश टाकेल.
तत्त्वज्ञानाचे सखोल मार्गदर्शन
या संगीत संवादाला अधिक वैचारिक खोली देण्यासाठी, डॉ. धनश्री लेले हिंदीमध्ये अभ्यासपूर्ण निवेदन व भाष्य करतील, ज्यामुळे श्रोत्यांना दोन्ही संतांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा सहजपणे समजू शकेल. कार्यक्रमात त्यांना मन्दार पुराणिक (तबला), ज्ञानेश्वर सोनावणे (हार्मोनियम) यांच्यासह अन्य कुशल कलाकार साथ देणार आहेत. पंचम निशादचे संस्थापक-संचालक शशी व्यास यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम भक्ती आणि संगीताच्या माध्यमातून आत्मिक अनुभूती देणारा ठरेल. 6 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची तिकीटे www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी