
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2 दिवसांच्या भारत दौर्यावर येणार आहेत. आगामी 4 आणि नोव्हेंबरला ते भारतात राहतील. या दोन दिवसीय दौर्यात गिदोन सार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील.
भारत दौऱ्यादरम्यान गिदोन सार हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक घडामोडी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात म्यूनिखमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जयशंकर आणि गिदोन सार यांची भेट झाली होती. त्या वेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये येमनमधील हूती बंडखोर, इराणचा प्रश्न आणि इतर आंतरराष्ट्रीय विषयांवरही चर्चा झाली होती.जयशंकर आणि गिदोन सार यांनी इस्रायलच्या माध्यमातून आशिया, युरोप आणि अमेरिका यांना जोडणाऱ्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीकोनावरही विचारविनिमय केला होता.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, 2023 च्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान भारत ते युरोपपर्यंतच्या एका इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाचा उद्देश मध्य पूर्वेद्वारे आशिया आणि युरोपला जोडणे हा होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या प्रकल्पाला ऐतिहासिक म्हटले होते आणि तो मध्य पूर्व तसेच इस्रायलची प्रतिमा बदलवेल, असेही नमूद केले होते. नंतर माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही या प्रकल्पात रस दाखवला आणि त्याचा विस्तार अमेरिकेपर्यंत करण्याबाबत चर्चा झाली.
भारत आणि इस्रायल यांनी अलीकडेच इस्रायलचे अर्थमंत्री स्मोटिच यांच्या भारत दौर्यादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.सन 2000 नंतर इस्रायलने भारतासह संयुक्त अरब अमीरात, जपान, फिलिपाईन्स, थायलंड, दक्षिण आफ्रिका इत्यादी अनेक देशांबरोबर गुंतवणूक करार केले आहेत. गाझा संघर्ष आणि प्रादेशिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही, गेल्या 2 वर्षांत इस्रायलचे अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी भारताच्या दौर्यावर आले आहेत.
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी