बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई, 30 ऑक्टोबर (हिं.स.) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात हा ग
रोहित पवार


मुंबई, 30 ऑक्टोबर (हिं.स.) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपाचे सोशल मीडिया सहसंयोजक धनंजय वागस्कर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रोहित पवारांनी बनावट आधारकार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं होतं. त्यानुसार बनावट आधार कार्ड तयार करुन कशा पद्धतीनं पुरावे उभे केले जातात आणि मिटवलेही जातात हे सांगितलं होतं. आ. रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार केले. देशाच्या ओळख पडताळणी प्रणालीतील त्रुटी अधोरेखित करण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचा पवारांचा दावा आहे.

या घटनेनंतर, भाजपाचे पदाधिकारी धनंजय वागस्कर यांनी रोहित पवारांविरुद्ध मुंबईतील दक्षिण विभागीय सायबर पोलीस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली. रोहित पवार यांनी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि लोकांमध्ये गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वागस्कर यांनी केला. तक्रारीच्या आधारावर, मुंबई सायबर पोलिसांनी रोहित पवार यांच्यासह या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लोकांविरोधात कारवाई केली. डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, लवकरच पुढील कारवाई केली जाईल.

कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, ओळख पडताळणी प्रणालीतील त्रुटी दाखवण्यासाठीही अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करणे, हा मोठा गुन्हा आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि लोकांच्या सरकारी प्रणालीवरील विश्वासाला हानी पोहोचू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande