

फ्लोरिडा/ मुंबई, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे नुकत्याच झालेल्या पिकल बॉल वर्ल्ड कप २०२५ मध्ये सिंधूर मित्तल आणि त्यांच्या जोडीदार रक्षिका रवी यांनी भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या ओपन डबल्स ५.० गटात या जोडीने रौप्य पदक पटकावले. या विजयामुळे जागतिक पिकल बॉल नकाशावर भारताने आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली आहे.
अवाडा समूहाच्या उपाध्यक्षा असलेल्या सिंधूर मित्तल यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे. संपूर्ण चॅम्पियनशिपमध्ये मित्तल आणि रवी यांच्या उत्कृष्ट समन्वयाने अनुभवी प्रतिस्पर्धी जोड्यांवर मात केली. अंतिम फेरीत त्यांची लढत अगदी अटीतटीची झाली, मात्र त्यांनी मिळवलेले रौप्य पदक हे भारताच्या पिकल बॉल खेळातील वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
भारतासाठी हा वर्ल्ड कप पदकांची लयलूट करणारा ठरला. सिंधूर मित्तल आणि रक्षिका रवी यांच्या रौप्य पदकाव्यतिरिक्त, विजय छाब्रिया यांनी भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले, तर माजी टेनिसपटू नितीन कीर्तने यांनीही ५०+ पुरुष एकेरीच्या ५.० गटात सुवर्ण पदक जिंकले.
सिंधूर मित्तल यांच्या यशाने देशातील अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी