पोलिस कारवाईत ११९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण ब्राझीलमध्ये विरोध निदर्शने सुरू
ब्रासीलिया, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे अमली पदार्थांच्या टोळीविरुद्ध पोलिसांच्या छापेमारी मोहिमेदरम्यान किमान ११९ लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंनंतर संपूर्ण ब्राझीलमध्ये तीव्र विरोध प्रदर्शन सुरू झाले असून आंदोलनकर्त्या
पोलिस कारवाईत ११९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर  संपूर्ण ब्राझीलमध्ये विरोध निदर्शने सुरू


ब्रासीलिया, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे अमली पदार्थांच्या टोळीविरुद्ध पोलिसांच्या छापेमारी मोहिमेदरम्यान किमान ११९ लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंनंतर संपूर्ण ब्राझीलमध्ये तीव्र विरोध प्रदर्शन सुरू झाले असून आंदोलनकर्त्यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलिसांची ही कारवाई शहराच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि घातक मोहिमांपैकी एक मानली जात आहे.

या कारवाईत झालेल्या मृत्यूंनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर एका विशिष्ट समाजघटकाला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. मोठ्या संख्येने लोक सरकारी मुख्यालयासमोर जमा झाले, घोषणाबाजी केली आणि लाल रंगाने रंगवलेले ब्राझीलचे झेंडे फडकावले. मृतांचा आकडा आणि शवांच्या अवस्थेबद्दल (विकृती, चाकूचे घाव इत्यादी) अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने, सरकारी वकिलांनी आणि खासदारांनी राज्यपाल क्लॉडिओ कास्त्रो यांच्याकडे या मोहिमेची सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी केली आहे.

रिओ दि जानेरो येथे जवळपास २,५०० पोलिस आणि सैनिकांनी पेन्हा आणि कॉम्प्लेक्सो दि अलेमाओ या भागात छापे टाकले. यामध्ये मृतांचा आकडा अधिकृत आकड्यापेक्षा खूप जास्त असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ६० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते, परंतु वास्तविक संख्या १०० पेक्षा अधिक आहे.पोलिस आणि सैनिकांनी हेलिकॉप्टर, बख्तरबंद वाहने आणि पायदळ दलांच्या सहाय्याने ही मोहीम सुरू केली होती, ज्याचे लक्ष्य ‘रेड कमांड’ नावाची टोळी होती.

रिओ दि जानेरोचे राज्यपाल क्लॉडिओ कास्त्रो यांनी सांगितले, “आमच्यासमोर अत्यंत गंभीर आव्हान आहे. हे साधे गुन्हेगारी कृत्य नाही, तर डाव्या विचारसरणीच्या कैद्यांच्या गटातून तयार झालेले एक संघटित आंतरराष्ट्रीय माफिया नेटवर्क आहे, जे अमली पदार्थ तस्करी आणि खंडणी यामध्ये गुंतलेले आहे. ही टोळी नेहमीच प्रतिस्पर्धी गटांशी आणि सुरक्षा दलांशी संघर्ष करत असते.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande