
बीजिंग, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनने आपल्या अंतराळ कार्यक्रमाबाबत मोठी घोषणा केली आहे. बीजिंगने गुरुवारी जाहीर केले की 2030 पर्यंत चीन आपले अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासोबतच त्यांनी त्या अंतराळवीरांच्या नव्या पथकाचाही परिचय करून दिला आहे, जे लवकरच चीनच्या अंतराळ स्थानकाकडे रवाना होणार आहेत.
चीनच्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमाचे प्रवक्ते झांग जिंगबो यांनी सांगितले, “सध्या चंद्र मोहिमेसाठी चालणारे सर्व संशोधन आणि विकासकार्य सुरळीतपणे सुरू आहे.” त्यांनी पुढे सांगितले की लाँग मार्च-10 रॉकेट, चंद्रावर उतरवण्यासाठी बनवले जाणारे स्पेससूट, आणि अन्वेषण वाहन (लुनर रोव्हर) यांसारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली आहे. “2030 पर्यंत चंद्रावर मानव उतरवणे निश्चित आहे,” असे त्यांनी आत्मविश्वासाने म्हटले.
चीन आता आपल्या तियानगोंग अंतराळ स्थानकासाठी नवीन अंतराळवीरांचा ताफा पाठवण्याची तयारी करत आहे. हा मिशन चीनच्या विस्तृत अंतराळ कार्यक्रमाचा भाग आहे. ज्यामध्ये प्रत्येक पथक सहा महिन्यांपर्यंत स्थानकात राहून वैज्ञानिक संशोधन करते.या नव्या पथकात झांग लू, वू फेई, आणि झांग होंगझांग यांचा समावेश आहे. हे पथक शुक्रवारी रात्री 11:44 वाजता (चीनच्या वेळेनुसार) जिउक्वान प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण करणार आहे. झांग लू हे यापूर्वी शेनझोउ-15 मोहिमेचा भाग राहिले आहेत, तर वू फेई आणि झांग होंगझांग हे पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करणार आहेत.
यावेळी अंतराळवीर आपल्या सोबत चार उंदीर (दोन नर आणि दोन मादी) घेऊन जातील, ज्यांच्यावर अवकाशातील निर्वात आणि गुरुत्वशून्यता या परिस्थितींचा त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर होणारा परिणाम अभ्यासला जाईल.चीनने तियानगोंग अंतराळ स्थानकाचे बांधकाम त्यावेळी सुरू केले होते, जेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) कार्यक्रमातून वगळण्यात आले होते. अमेरिकेने त्यावेळी चीनच्या अंतराळ कार्यक्रमाचे पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) शी थेट संबंध असल्याचे सांगत सुरक्षा चिंतांचा हवाला दिला होता. त्यानंतर चीनने स्वतःच्या बळावर अंतराळ क्षेत्रात नव्या संधी आणि शक्यता शोधण्यास सुरुवात केली..
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode