
राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग आहे.
भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि मुत्सद्दी दृष्टिकोनाने भारताच्या अखंडतेचा पाया रचला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुजरातमध्ये उभारलेला १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आज जगातील सर्वाधिक उंच पुतळा असून, २०२४-२५ या वर्षात तब्बल ६०.५९ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय उत्सव
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील युवक, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करणे हा आहे. जनभागीदारीद्वारे राष्ट्रनिर्माण करण्यासाठी या उपक्रमाद्वारे युवक, स्वयंसेवक, नागरिक आणि समाजातील सर्व घटकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या प्रोत्साहनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहपुरूष सरदार पटेल यांच्या कार्याची ओळख युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी करमसाड, अहमदाबाद (सरदार पटेल यांचे जन्मस्थान) येथून सुरू होऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे संपन्न होणार आहे. या प्रवासात युवक, माय भारत स्वयंसेवक, एनएसएस व यंग लीडर्स विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये सहभागी होतील. या मार्गातील गावे, जिल्ह्यांच्या १५० ठिकाणी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सरदार गाथा सत्रांचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये सरदार पटेल यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून, देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ‘सरदार@150 एकता मोहिमे’त सहभागी होण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
भारत पर्व अंतर्गत राज्यात विविध उपक्रम
महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना लोहपुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळून सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, या विचारातून क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन संयुक्तिकरित्या जिल्हास्तरीय पदयात्रा काढणार असून प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० कि.मी. अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रा, निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा, सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याद्वारे अशा अभिनव स्पर्धा आणि कार्यक्रमांतून देशभर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
स्वराज्य : एकतेचा धागा
गुजरात येथे राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी स्वराज्य : एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत १४ कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्साठी गोंधळ, नृत्य, कोळी नृत्य, लावणी तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले १५ ते २० कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या उपक्रमांद्वारे राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.
गुजरातमध्ये भव्य भारत पर्व सोहळा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य भव्य सोहळा गुजरातमधील एकता नगर (जिल्हा नर्मदा) येथे करण्यात येणार आहे. यावेळी भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. संचलनादरम्यान सीएपीएफ आणि विविध राज्यांच्या पोलिस तुकड्या त्यांच्या शौर्य, शिस्त आणि कौशल्याचे प्रदर्शन करतील. या संचलनात बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, तसेच महाराष्ट्र, पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आणि छत्तीसगड राज्यांच्या पोलीस तुकड्या सहभागी होतील. घोडदळ, उंटदळ, भारतीय श्वानांच्या प्रजाती, तसेच विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे सादरीकरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्याद्वारे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार आहेत.
‘भारत पर्व’ मधून विविधतेत एकतेचे दर्शन
1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या भव्य सोहळ्यात विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करून या महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या संस्कृतीची समृद्ध विविधता आणि राष्ट्रीय एकतेला उजाळा देणारे 900 कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.
गुजरात येथे १८०० चौरस मीटर अशा भव्य परिसरात गुजरात शासनाच्या पर्यटन विभागामार्फत सिंगल डोम (जर्मन हँगर स्ट्रक्चर) उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रदर्शनासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांसाठी थीम पॅव्हेलियनसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार आहे. थीम पॅव्हेलियन्साठी हँगर स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक पॅव्हेलियनचे परिमाण पाच मीटर x पाच मीटर इतके असणार आहे.
विविध खाद्यपदार्थांचे ४५ तसेच हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे ५५ असे १०० स्टॉल्स असणार आहेत. हस्तकला वस्तूंचे स्टॉल केंद्र शासनाच्या हस्ततंत्र व हस्तकला विकास आयुक्तालयामार्फत तर पाच स्टॉल हस्तकला आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत. १०.८ चौरस मीटर परिसरात हे स्टॉल असतील याचे व्यवस्थापन गुजरात सरकारच्या पर्यटन विभागामार्फत केले जाणार आहे.
४५ स्टॉल्स खाद्यपदार्थांसाठी असणार आहेत. यापैकी पाच दालने ही आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत.
तर ३० स्टॉल हे नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर ऑफ इंडिया यांच्यामार्फत उभारण्यात येणार असून, उर्वरित पर्यटन विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत.
स्टुडिओ किचनची उभारणी आयएचएम गांधीनगरतर्फे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या समन्वयाने १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येईल. पर्यटन विभागामार्फत येथे येणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पर्यटक आणि सहभागी युवकांना विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे केंद्र उभारून विविधतेत एकतेचे दर्शन या सोहळ्याच्या माध्यमातून घडणार आहे.
एक भारत, श्रेष्ठ भारताच्या संकल्पनेला नवा उत्साह
३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे एकावेळी दोन राज्ये अशा पद्धतीने भारत पर्व अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
श्रद्धा मेश्राम
विभागीय संपर्क अधिकारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई -32
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर