
गुवाहाटी, २९ ऑक्टोबर (हिं.स.) येथील एसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला १२५ धावांनी पराभव करत इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले. तिने १६९ धावा केल्या. तिचे हे १० वे एकदिवसीय शतक आणि पहिलेच विश्वचषक शतक ठरले आहे. वोल्वार्डने ताजमिन ब्रिट्स (४५) सोबत पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने चार विकेट्स घेऊन पुनरागमन केले असले तरी, दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत 7 बाद ३१९ धावा केल्या.
३२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी फक्त एका धावेत तीन विकेट्स गमावल्या. पहिल्याच षटकात मॅरिझॅन कॅपने एमी जोन्स आणि हीदर नाईटला बाद केले. दुसऱ्या षटकात अयाबांगा खाकाने टॅमी ब्यूमोंटला बाद करून इंग्लंडची परिस्थिती आणखी बिकट केली.
कर्णधार नताली सिव्हर-ब्रंट (६४) आणि ऍलिस कॅप्सी (५०) यांनी चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून इंग्लंडला काहीसा दिलासा दिला. पण त्यानंतर संघ सावरू शकला नाही. कॅपने शानदार गोलंदाजी केली, तिच्या 7 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २० धावांत पाच विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संघ ४२.३ षटकांत १९४ धावांतच संपुष्टात आला.
गेल्या दोन विश्वचषकांच्या (२०१७ आणि २०२२) उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. चालू स्पर्धेच्या साखळी टप्प्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ ६९ धावांतच संपुष्टात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे