
मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। सॅमसंग इंडियाने महिंद्रा इलेक्ट्रिकच्या ओरिजिन मालिकेतील XEV 9e आणि BE 6 या ईएसयूव्ही मॉडेल्ससाठी सॅमसंग वॉलेटद्वारे डिजिटल कार की सुविधा सुरू केली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे गॅलेक्सी स्मार्टफोनधारकांना फिजिकल चावीशिवाय वाहन लॉक, अनलॉक आणि स्टार्ट करता येणार आहे. महिंद्रा ही सॅमसंग वॉलेटसोबत अशी सुविधा देणारी भारतातील पहिली वाहननिर्माती कंपनी ठरली आहे. सॅमसंग वॉलेट हे गॅलेक्सी डिव्हाइसेसमध्ये असलेलं इनबिल्ट अॅप असून, त्याद्वारे वापरकर्ते आपला स्मार्टफोन वाहनाजवळ आणून दरवाजे उघडू किंवा बंद करू शकतात तसेच वाहन रिमोटली स्टार्टही करू शकतात. विशेष म्हणजे, ही डिजिटल की मित्र किंवा कुटुंबीयांसोबत मर्यादित कालावधीसाठी शेअर करता येते, ज्यामुळे वाहन वापर व्यवस्थापन अधिक सोयीस्कर होते. सॅमसंग इंडिया सर्व्हिसेस अँड अॅप्स बिझनेसचे वरिष्ठ संचालक मधुर चतुर्वेदी म्हणाले, “महिंद्रा ईएसयूव्ही मालकांना सॅमसंग डिजिटल कीची सुविधा देताना आम्हाला आनंद होत आहे. हे गॅलेक्सी इकोसिस्टममधील सुरक्षित आणि कनेक्टेड अनुभव वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.” महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोटिव्ह विभागाचे सीईओ नलिनीकांत गोलागुंता म्हणाले, “आमच्या XEV 9e आणि BE 6 मॉडेल्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सॅमसंगसोबतची ही भागीदारी ग्राहकांचा प्रवास अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानसंपन्न करेल.” सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅमसंगने या सेवेमध्ये ‘सॅमसंग फाइंड’ सुविधा दिली आहे, ज्याद्वारे डिव्हाइस हरवल्यास डिजिटल की रिमोटली लॉक किंवा डिलीट करता येते. तसेच, बायोमेट्रिक किंवा पिन प्रमाणीकरण अनिवार्य असून, सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी तंत्रज्ञान वापरकर्त्यांची गोपनीयता सुनिश्चित करते. सॅमसंग वॉलेटमधील डिजिटल की, पेमेंट्स आणि आयडी कार्ड्स या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहेत, ज्यामुळे गॅलेक्सी यूजर्सना अधिक स्मार्ट आणि सुरक्षित मोबिलिटी अनुभव मिळतो. या भागीदारीमुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule