
मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। इटालियन मोटारसायकल निर्माती डुकाटीने भारतीय बाजारात 2026 मॉडेल मल्टिस्ट्राडा V2 सादर केली असून ही बाइक आता अधिक हलकी, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाने समृद्ध बनली आहे. कंपनीने या ॲडव्हेंचर टूरिंग बाइकची किंमत स्टँडर्ड व्हर्जनसाठी 18.88 लाख रुपये ठेवली आहे, तर मल्टिस्ट्राडा V2 S व्हर्जनची किंमत डुकाटी रेड शेडसाठी 21 लाख रुपये आणि स्टॉर्म ग्रीन शेडसाठी 21.3 लाख रुपये आहे.
डिझाइनच्या दृष्टीने नव्या मल्टिस्ट्राडा V2 मध्ये पूर्वीच्या मॉडेलशी साम्य राखण्यात आले आहे. MY26 व्हर्जनमध्ये स्लिक फ्रंट एंड, सुधारित एलईडी हेडलाइट्स, नवीन DRLs, 19 लिटर क्षमतेचा स्कल्प्टेड फ्युएल टँक, मजबूत टँक श्राउड्स आणि उंच विंडशील्ड दिले आहे. नव्याने डिझाइन केलेला एक्झॉस्ट कॅनिस्टर या बाइकलाही अधिक आकर्षक बनवतो.
या बाइकमध्ये ऍल्युमिनियम मोनोकॉक फ्रेम असून त्यामुळे वजनात मोठी कपात झाली आहे. 2026 मल्टिस्ट्राडा V2 चे वजन आता पूर्वीपेक्षा 18 किलोने कमी झाले असून बेस व्हर्जनचे ड्राय वेट 119 किलो आहे. दोन्ही व्हर्जनमध्ये समान 890 सीसी 90-डिग्री V-ट्विन इंजिन असून ते 115 बीएचपी पॉवर आणि 92 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
फीचर्सच्या बाबतीत या बाइकमध्ये 5 इंच टीएफटी कलर डिस्प्ले, नवीन इंटरफेस आणि तीन माहिती मोड्स दिले आहेत. रायडर्सना स्पोर्ट, टूरिंग, अर्बन, एंड्युरो आणि वेट असे पाच रायडिंग मोड्स मिळतात. हे मोड्स कॉर्नरिंग ABS, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोल या प्रणालींशी समन्वय साधतात. याशिवाय क्रूझ कंट्रोल, युएसबी पोर्ट आणि इमर्जन्सी ब्रेकिंगदरम्यान फ्लॅश होणारा डुकाटी ब्रेक लाइट EVO ही वैशिष्ट्येही उपलब्ध आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आदर्श असलेली ही बाइक हलक्या वजनामुळे आणि शक्तिशाली इंजिनमुळे रोड तसेच ऑफ-रोड दोन्ही परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी देते. डुकाटीच्या या नवीन लॉंचमुळे भारतीय ॲडव्हेंचर बाइक सेगमेंटमध्ये नवी स्पर्धा निर्माण होणार असून ग्राहकांना आता अधिक प्रगत आणि आकर्षक पर्याय मिळणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule