
मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड आणि गूगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात ऐतिहासिक भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. या धोरणात्मक करारामुळे जिओ ग्राहकांना आता 18 महिन्यांसाठी मोफत गूगल एआय प्रो वापरण्याची संधी मिळणार आहे. ‘एआय फॉर ऑल’ या रिलायन्सच्या दृष्टिकोनाला बळ देत ही भागीदारी भारतातील नागरिक, उद्योग आणि विकासकांना प्रगत एआय साधनांचा लाभ देणार आहे.
रिलायन्सची प्रचंड डिजिटल पायाभूत सुविधा आणि ग्राहकसंख्या यांचा गूगलच्या जागतिक एआय कौशल्याशी समन्वय साधून देशातील एआय वापर लोकाभिमुख केला जाणार आहे. या सहकार्यातून भारताच्या डिजिटल रचनेला मजबुती मिळेल आणि नाविन्यपूर्ण, समावेशक एआय भविष्य घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, “रिलायन्स इंटेलिजन्सच्या माध्यमातून 1.45 अब्ज भारतीयांना बुद्धिमत्ता सेवा उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. गूगलसारख्या दीर्घकालीन भागीदारांसोबत भारत एआय-सशक्त राष्ट्र बनेल.”
या करारानुसार जिओ ग्राहकांना 18 महिन्यांसाठी गूगल एआय प्रोची मोफत सुविधा मिळेल. यात जेमिनी 2.5 प्रो मॉडेल, नॅनो बॅनाना, व्हेओ 3.1 द्वारे उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा आणि व्हिडिओ निर्मिती, नोटबुक LM ची विस्तारित सेवा तसेच 2 टीबी क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे. ही ऑफर जवळपास 35,100 रुपयांची असून ती पात्र जिओ ग्राहकांना मायजिओ अॅपद्वारे सक्रिय करता येईल. प्रारंभी 18 ते 25 वयोगटातील अनलिमिटेड 5G योजना ग्राहकांना ही सुविधा प्राधान्याने मिळेल, त्यानंतर देशभरातील सर्व जिओ वापरकर्त्यांसाठी ती उपलब्ध केली जाईल.
या सहकार्यात स्थानिक भाषा आणि संस्कृतीनुसार एआय अनुभव विकसित करण्यात येणार आहेत. तसेच, उद्योगांसाठी ‘जेमिनी एंटरप्राइज’ या एकात्मिक एआय व्यासपीठाची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स गूगल क्लाउडच्या टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स (TPUs) चा वापर वाढवून मोठ्या एआय मॉडेल्सच्या प्रशिक्षण आणि कार्यान्वयनाला गती देईल. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय एआय पायाभूत सुविधेला बळ मिळेल आणि देशाला जागतिक एआय महासत्ता बनविण्याच्या दिशेने पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला चालना मिळेल.
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले, “रिलायन्ससोबत आम्ही परवडणाऱ्या इंटरनेट आणि स्मार्टफोनद्वारे लाखो भारतीयांना डिजिटल जगाशी जोडले. आता एआय युगात हीच भागीदारी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता साधने ग्राहक, उद्योग आणि विकासकांपर्यंत पोहोचवेल.”
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी असून, 31 मार्च 2025 अखेर कंपनीने 10,71,174 कोटी रुपयांचा महसूल आणि 81,309 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. या नव्या एआय भागीदारीमुळे रिलायन्स आणि गूगल दोन्ही कंपन्या भारतीय डिजिटल भविष्याला नवा आयाम देणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule