कोल्हापूर - जिल्ह्यातील ३१२ जणांची अनुकंपा व सरळ सेवा लिपीक संवर्गातून नियुक्ती
कोल्हापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या जुलै २०२५ मधील सुधारित अनुकंपा धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यातून मिळालेल्या या अमूल्य संधीचा पूर्णपणे सदुपयोग करा आणि लोकाभिमुख कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडा, असे आवाहन शासकीय सेवेतील नवनिय
उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्य शासनाच्या जुलै २०२५ मधील सुधारित अनुकंपा धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यातून मिळालेल्या या अमूल्य संधीचा पूर्णपणे सदुपयोग करा आणि लोकाभिमुख कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडा, असे आवाहन शासकीय सेवेतील नवनियुक्त अनुकंपा व सरळ सेवा उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात अनुकंपा धोरण व सरळ सेवेच्या माध्यमातून सुमारे १० हजार उमेदवारांना विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळाली. या मोहिमेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील ३१२ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी करण्यात आले.

महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित निवड प्राधिकरण कार्यालयांचे विभागप्रमुख, नियुक्ती मिळवलेले उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

या वेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, गेल्या १० वर्षांच्या अथक संघर्षातून, आझाद मैदानावरील तरुणांच्या लढ्यापासून कोल्हापूरचं नातं या अनुकंपा सुधारित धोरण प्रक्रियेशी जोडले होते. आता सुधारित धोरणामुळे अनेक वर्षांच्या वाट पाहणाऱ्यांना अखेर न्याय मिळाला. शासन निर्णयात आलेल्या स्पष्टतेमुळे आणि १०० व १५० दिवसांच्या कार्यक्रमातील प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही संधी १६४ जणांना लाभली. यासोबतच सरळ सेवेतील १४८ उमेदवारांनीही शासकीय नोकरीची जबाबदारी पेलत नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्याव्यात. त्यांनी आपल्या बोलण्यातून नवनियुक्तांना कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा यावेळी दिली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले प्रत्येकाने आपल्या कामातून यश मिळवून उच्च पदावर झेप घ्यावी आणि चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श निर्माण करावा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो. १०० दिवसांच्या शासकीय गतिमानता अभियानातील हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच, उमेदवारांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन आई-वडिलांना जपण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणामुळे भरती प्रक्रियेला वेग आल्याचे सांगितले. माननीय पालकमंत्री स्तरावर २, स्वतः १० तर निवासी उपजिल्हाधिकारी स्तरावर ५ बैठकांद्वारे अनुकंपा यादी व शिफारस प्रक्रिया गतीने अंतिम केली. राज्य शासनाच्या अनुकंपा मार्गदर्शक सुचना नियमावलीतील बदल समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचा सहभाग होता, असे त्यांनी नमूद केले. प्रातिनिधिक स्वरूपात दोन्ही गटातील १० उमेदवारांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच,

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३१२ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. अनुकंपा अंतर्गत जिल्हाधिकारी कोल्हापूर सर्व विभागांमधून गट क मधील ४१ आणि गट ड मधील ५६ उमेदवारांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही नियुक्त्या झाल्या असून, कोल्हापूर महानगरपालिकेत गट क मधील ७ व गट ड मधील २३ जणांना, तर इचलकरंजी महानगरपालिकेत गट क मधील २ व गट ड मधील ८ जणांना नियुक्ती मिळाली. नगरपरिषद कागल व वडगाव येथे गट क व ड मधून अनुक्रमे २ व १ जणांना आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेत गट क मधील १८ व गट ड मधील ६ जणांचा अनुकंपा अंतर्गत समावेश होता. दरम्यान, सरळ सेवा नियुक्तीमध्ये विविध शासकीय विभागांमध्ये १४८ उमेदवारांना नियुक्तीपत्रे यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande