ठाणे - 530 लिपिक टंकलेखकांना मिळाले शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश
ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। अनुकंपा तत्त्वावर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या व ज्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत त्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने लोकाभिमुख काम करून विकसित महाराष्ट्र 2047
530 लिपिक टंकलेखकांना मिळाले शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश


ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। अनुकंपा तत्त्वावर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या व ज्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत त्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने लोकाभिमुख काम करून विकसित महाराष्ट्र 2047 चे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपले योगदान द्यावे , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले.

अनुकंपा तत्त्वावरील व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या एकूण 530 लिपिक टंकलेखकांना नियुक्तपत्र देण्याचा ऐतिहासिक सोहळा ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित राज्य स्तरावरील मुख्य राज्य रोजगार मेळाव्याचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपणही यावेळी करण्यात आले होते.

याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर आदिवासी विकास प्रकल्प आयुक्त गोपीचंद कदम, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, वैशाली माने, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, नियुक्ती पात्र ठरलेले उमेदवार आणि पालक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ पुढे म्हणाले की, अनुकंपा विषयाबाबत तब्बल 45 शासन निर्णयांबाबत एकत्र विचार करून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कागदपत्रांची पडताळणी हा अतिशय क्लिष्ट आणि वेळ लावणारा विषय सर्वांनी मिळून संघ भावनेने काम करून केवळ दोन ते अडीच महिन्यात पूर्ण केला. छाननी केलेल्या उमेदवारांसाठी समुपदेशन आणि माहिती मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाने सर्वोच्च संवेदनशीलता आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपली. सामान्य प्रशासन विभागाचे मनापासून आभार. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नवनियुक्त उमेदवारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याप्रमाणेच या भारतमातेची समाजाची सेवा करा. मेहनतीशिवाय पर्याय नाही, जबाबदारीने काम करा, देशाच्या उज्वल भविष्याबाबत आजच्या तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.

आमदार संजय केळकर म्हणाले की, आजचा हा सोहळा रोजगाराचा उत्सव आहे. शासन प्रशासनाने मिळून काम केल्यास सुशासन दिसून येते. सकारात्मक विचारांनी आपण जनतेचे हित प्रत्यक्षात बघू शकतो. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक आहे की, त्यांनी अधिकचा वेळ देऊन ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. राज्याच्या विकासाच्या वारीत नवनियुक्त उमेदवारांचा समावेश झाला आहे. शेवटी प्रामाणिकपणाने झोकून देऊन काम करा, असे आवाहनही त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande