नाशिक, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आदि कर्मयोगी अभियान सुरु केले. हे अभियान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी संलग्न प्रशिक्षण कार्यक्रम आहे. त्याअंतर्गत १७ नोव्हेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यभर ‘आदिसेवा पर्व राबविण्यात आले होते. या पर्वात आदि-कर्मयोगी अभियानात समावेश असलेल्या ६,८५९ गावांमध्ये ‘आदिसेवा’ केंद्रे कार्यान्वित करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांच्या समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ही केंद्रे कार्यरत राहणार आहे.
‘आदिसेवा पर्व’ विशेष मोहिमेद्वारे आदिवासी भागातील विकासाला गती आली. या मोहिमेत गाव पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात आले, ज्यात शिवारफेरी, महिला सभा, वार्ड सभा आणि घरोघरी भेटींचा समावेश होता. शिवार फेरीद्वारे शेती आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्दे समजून घेण्यात आले, तर महिला सभांमधून महिलांच्या गरजा आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा झाली. वार्ड सभांद्वारे स्थानिक पातळीवरील समस्या उजेडात आल्या. गावकऱ्यांच्या गरजा जाणून घेत विकास आराखडा तयार करण्यात आला.
गाव विकास आराखड्यानुसार पुढील पाच वर्षांत आदिवासी समाजाला आवश्यक सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या आराखड्यांना २ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्येक आदिसेवा केंद्रात दरआठवड्याला विविध अधिकारी उपस्थित राहून आदिवासी बांधवांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करणार आहे. यामध्ये ग्रामविकास, महसूल, कृषी, आदिवासी विकास विभाग आदी शासकीय यंत्रणातील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
प्रतिसादात्मक प्रशासनाची निर्मिती आदि कर्मयोगी अभियानाअंतर्गत प्रतिसादात्मक प्रशासन निर्मितीसाठी देशात २० लाख तर राज्यात सुमारे १ लाख आदि कर्मयोगीची फौज उभारली जात आहे. यामुळे प्रशासन आणि आदिवासी बांधव यांच्यात थेट संवाद साधण्याची प्रभावी व्यवस्था निर्माण झाली आहे. या अभियानात महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमधील १९९ तालुक्यातील ६,८५९ गावांचा समावेश आहे. निवड झालेल्या गावांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहे.
आदि-कर्मयोगी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या आदिसेवा पर्वामुळे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल. लोकसहभाग आणि प्रशासनाचा सक्रिय पाठपुरावा यांच्या माध्यमातून गाव विकास आराखडा प्रभावीपणे राबविला जाईल. यामुळे पुढील पाच वर्षांत आदिवासी समाजाला आवश्यक सर्व मूलभूत सेवा उपलब्ध होऊन सर्वांगीण विकास साधता येईल.-डॉ. अशोक वुईके, आदिवासी विकास मंत्री
आदि-कर्मयोगी अभियान हे आदिवासी विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. आदिसेवा पर्वाच्या माध्यमातून सुरू झालेली ही प्रक्रिया आदिवासी समाजाला सशक्त करण्याच्या दिशेने एक पाउल आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.-विजय वाघमारे, सचिव आदिवासी विकास विभाग
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV