छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.) :पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती मात्र आता शहरीकरणामुळे गांव ओस पडली आहेत.दुसरीकडे शहरे बकाल झाली. या काँक्रीट कल्चर मुळे माणसातील ओलावा कमी झाला. मोबाईल आल्यानंतर तर माणसातील संवाद घटला. असे प्रतिपादन पाटोदा आदर्श गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अध्यासन केंद्रातर्फे पाटोदा या आदर्श गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान झाले. मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.संजय साळुंके अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी भास्करराव पेरे पाटील यांचे ’मेरा गांव मेरा देश’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर खेडयातील लोक नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्थलांतरित झाली. त्यामुळे खेडी ओस पडली. दुसरीकडे शहरे बकाल झाली. या काँक्रीट कल्चर मुळे माणसातील ओलावा कमी झाला. मोबाईल आल्यानंतर तर माणसातील संवाद घटला. एका गावातच राहणारी माणसे सुख दुःखाल सहभागी होत नाहीत. म्हणून एकलकोंडेपणा वाढला. खेडी पुन्हा स्वावलंबी करावयाची असतील तर शिक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य आणि विचारपूर्वक कृती ही पंचमुखी सोडण्याचा विकासासाठी गरजेची आहे, असेही भास्करराव पेरे पाटील म्हणाले.
तर गावखेड्यातील बदलते स्वरूप अधिक चिंताजनक असून समुपदेशनाचे आणखी काम कारावे लागेल, असे डॉ.संजय साळुंके अध्यक्षीय समारोपात म्हणाले. आगामी काळात गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेत ग्रामीण विकासावर कार्यक्रम घेण्यात येईल. असेही ते म्हणाले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis