वडिलांच्या धाडसी कृतीमुळे बालकाचा जीव बचावला
जळगाव, 4 ऑक्टोबर (हिं.स.) यावल तालुक्यातील डोंगरकठोरा गावाजवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या धुळे पाडा या आदिवासी वस्तीतील सहा वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. मात्र, वडिलांच्या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कृतीमुळे बालकाचा जीव थोडक्यात बचा
वडिलांच्या धाडसी कृतीमुळे बालकाचा जीव बचावला


जळगाव, 4 ऑक्टोबर (हिं.स.) यावल तालुक्यातील डोंगरकठोरा गावाजवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या धुळे पाडा या आदिवासी वस्तीतील सहा वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. मात्र, वडिलांच्या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कृतीमुळे बालकाचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

धुळे पाडा येथील रहिवासी इगरा झेंदला बारेला (वय २८) हा आपल्या महेश (वय ६) या मुलासोबत गवत आणण्यासाठी शेतात गेला होता. गवताचे ओझे डोक्यावर घेत दोघे परतत असताना अचानक मागून बिबट्याने बालकावर झडप घातली. या हल्ल्यात बिबट्याने बालकाच्या डोक्याला आणि मानेजवळ चावा घेतल्याने गंभीर जखमा झाल्या. बालक किंचाळताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता डोक्यावरचे गवताचे ओझे थेट बिबट्याच्या अंगावर फेकले आणि जोरात आरडाओरडा केला. अचानक प्रतिकार झाल्याने बिबट्याने मागे हटून जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी बालकाला तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर व अमोल अडकमोल यांच्या पथकाने तातडीने उपचार केले. त्यानंतर शुक्रवारी बालकाला पुढील उपचारांसाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात पथक तैनात करण्यात आले आहे. ग्रामीण भागात या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande