चंद्रपूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारताच्या इतिहासातील शूर, पराक्रमी व प्रजाप्रेमी राणी दुर्गावती यांची जयंती रविवार, 5 ऑक्टोबर रोजी आहे. राणी दुर्गावती यांनी आपल्या शौर्य, पराक्रम व बलिदानाने आदिवासी समाज तसेच समस्त जनतेला प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करून विविध उपक्रम राबवावे, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.
राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 रोजी कलीनजर किल्ल्यावर झाला. शौर्य, पराक्रम आणि न्यायप्रियतेसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक कार्ये केली. राणी दुर्गावती आजही शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे राणी दुर्गावती यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आदिवासी विभागामार्फत या दिवशी सर्व प्रकल्प कार्यालय, आश्रमशाळा, वसतीगृहे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.
यात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, चित्रप्रदर्शन, निबंध स्पर्धा तसेच आदिवासी परंपरा व संस्कृतीवर आधारित उपक्रम राबविणे, यामुळे समाजातील नवीन पिढीपर्यंत राणी दुर्गावती यांच्या कार्याचा गौरवशाली संदेश पोहोचेल आणि आदिवासी समाजामध्ये जागरूकता व अभिमानाची भावना दृढ होईल, असेही निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव