मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) ‘शक्ती’ या नव्या चक्रीवादळाचा इशारा देत मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान या भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग ४५ ते ६५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो, तर समुद्रात प्रचंड उंच लाटा उठण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी आधीच अडचणीत आले आहेत. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असताना आता ‘शक्ती’ वादळामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचा हंगाम संपत असतानाही पावसाचा धोका कायम असून, हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील १४ राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. देशात सध्या एकाचवेळी तीन कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाले आहेत. पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर तयार झालेल्या या प्रणालींमुळे हवामान अस्थिर झाले असून, याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. कोकण किनारपट्टीवर विशेषतः मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रकिनारी हालचाली वाढल्या असून, भारतीय नौदल आणि कोस्ट गार्डला सतर्कतेच्या स्थितीत ठेवण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. राज्य सरकारने आपत्कालीन मदत पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून, पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणासह विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊ शकतो, तसेच शेतीचे अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात आधीच अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर नुकतेच जनजीवन पूर्ववत होत असतानाच ‘शक्ती’ वादळाचा धोका पुन्हा एकदा चिंता वाढवणारा ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule