नंदुरबार, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) दरा मध्यम प्रकल्पातील पाणी पाईप ड्रिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अंदाजे 13 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच या संदर्भात जलसंपदा मंत्री व सचिव स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीदरम्यान पालकमंत्री कोकाटे यांनी तत्काळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत, दरा प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करून देण्याची मागणी केली. शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पाला आज 20 वर्षे पूर्ण झाली असून, हा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. सध्या या प्रकल्पात तब्बल 500 एमसीएफटी इतका पाणीसाठा असूनही पाटबंधारे व्यवस्था नसल्याने या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणात सिंचनाची संधी वाया जात आहे.
या बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल पाटील यांच्यासह कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री कोकाटे यांनी सांगितले की, या विषयावर शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह लवकरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीतून प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करून, साठलेले पाणी पाईप सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे शहादा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना थेट सिंचनाचा लाभ मिळून, दरा प्रकल्पाचा उपयोग खऱ्या अर्थाने कृषी विकासासाठी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.
-------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर