तरुणाईने संवेदनशीलतेने काम करावे- माणिकराव कोकाटे
नंदुरबार, 4 ऑक्टोबर (हिं.स.) आज अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होणारी तरुणाई माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. परंतु यंत्र-तंत्राला भावना नसतात, हे लक्षात घेऊन डिजिटल युगातील या तरुणाईने जनभावनांची जाणीव ठेवून सं
पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे


नंदुरबार, 4 ऑक्टोबर (हिं.स.) आज अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होणारी तरुणाई माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. परंतु यंत्र-तंत्राला भावना नसतात, हे लक्षात घेऊन डिजिटल युगातील या तरुणाईने जनभावनांची जाणीव ठेवून संवेदनशीलतेने काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्ती प्रदान सोहळ्यात बोलत होते.

यावेळी आमदार सर्वश्री राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच निवड झालेले उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी १०० दिवस आणि नंतर १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यासोबतच एमपीएससीतर्फे घेतलेल्या लिपिक-टंकलेखक श्रेणीतील उमेदवारांनाही आज नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणारे ५२ तरुण आणि आपल्या पालकांना गमावूनही शासनाच्या अनुकंपा नियुक्तीद्वारे आधार मिळवणारे ९० उमेदवार हे सर्व आता शासन सेवेत पाऊल ठेवत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र–२०४७’ या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक ऐतिहासिक आणि ठोस सुधारणा केल्या आहेत. शासन सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती तसेच लिपिकांच्या वेळेत नियुक्तीची प्रक्रिया मिशन मोडमध्ये राबविण्यात आली. महाराष्ट्रात व्यापक भरती मोहीम राबविण्यात येत असून, त्यामध्ये १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती केली जात आहे. या ‘महा-भरती’चे वैशिष्ट्य असे आहे की ती केवळ भरतीपुरती मर्यादित नसून सुधारणा आणि परिवर्तनशील शासनपद्धतीच्या बांधिलकीवर आधारित आहे.” ते पुढे म्हणाले, “शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. परंतु, कधी तांत्रिक कारणांमुळे तर कधी प्रशासकीय कारणांमुळे या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती. अशा या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले, सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनुकंपा प्रतीक्षायादीतील उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. यामुळे अनुकंपांचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे.”

मान्यवरांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

या कार्यक्रमास आमदार सर्वश्री राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या लिपिक-टंकलेखक रोहित जायभावे (बीड) यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.एकूण १४२ उमेदवारांना देण्यात आली नियुक्ती

• ५२ उमेदवार गट-क महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक)

• ३१ उमेदवार अनुकंपा गट-क भरती

• ५९ उमेदवार अनुकंपा गट-ड भरती

अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण १४२ उमेदवारांचे शासकीय सेवेत येण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande