अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : शहरातील कॅम्प परिसरातील थॉमस चर्चजवळ एका मादी बिबट्या आपल्या पिल्लासह फिरताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. सदर परिसर घन लोकवस्तीचा असून शाळाही याच भागात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी वन विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.वन विभागाने नागरिकांसाठी विशेष सूचना जारी करत घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा एकटे फिरणे टाळावे, लहान मुलांना एकटे घराबाहेर न सोडावे, व पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.बिबट्या दिसल्यास त्याला त्रास देऊ नये, दगडफेक किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ 1926 / 77680 38884 या वन विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.शाळांनाही खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून, सक्तीचे मैदानावरील कार्यक्रम टाळणे, विद्यार्थी गटानेच हलवणे, व पालकांना वेळेवर माहिती देणे या सूचना देण्यात आल्या आहेत.घाबरू नका, अफवा पसरवू नका, असा स्पष्ट संदेश वन विभागाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी