लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी आपला दोन महिन्यांचा पगार पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केला.
गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवले आहे. मराठवाड्यासह विविध भागात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासन स्तरावर सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे माजी क्रीडामंत्री व उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन महिन्याचा पगार पाच लक्ष रुपयाचा धनादेश देऊन शेतकऱ्यांप्रती असलेली सहानुभूती त्यांनी जपली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार यांना राज्यातील ओल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी या उदात्त हेतूने आ. संजय बनसोडे यांनी स्वत:चा दोन महिन्यांचा पगार म्हणजे पाच लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis