गडचिरोली, 4 ऑक्टोबर (हिं.स.
नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने अस्तित्व स्टुडिओ च्या रूपाने ‘गोष्ट सुरू होते’ या मराठी चित्रपटाच्या शानदार शुभारंभाने एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय जोडला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली आणि पेरमिली च्या निसर्गरम्य, अतिदुर्गम भूमीत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला. जिथे एकेकाळी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमायचा, तिथे आता कॅमेऱ्याचा ‘ऍक्शन’ शब्द घुमणार आहे. गडचिरोलीच्या मातीतील सुप्त कलागुणांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची ही एक मोठी आणि कौतुकास्पद झेप आहे गडचिरोली तील प्रोडक्शन हाऊस अस्तित्व स्टुडिओ घेत आहे.
जिल्ह्यातील दुर्गमतेवर मात करत स्थानिक कलावंतांचे पाऊल आता चित्रपट सृष्टी कडे वळविण्याचे कार्य भूमीतील कलावंतांच्या सर्जनशीलतेने आणि निर्माता-दिग्दर्शकांच्या धैर्याने करण्याचा विळा उचलला आहे.
गोष्ट सुरु होते' हा चित्रपट केवळ मनोरंजन नव्हे, तर जिल्ह्याची ओळख केवळ नक्षलवादापुरती मर्यादित नसून, येथील नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि कला किती समृद्ध आहे, हे संपूर्ण देशाला दाखवणार आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटामुळे येथील स्थानिक कलाकारांना अभिनयाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून, या जिल्ह्याच्या सुप्त प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा हा अस्तित्व स्टुडिओ चा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रमुख अतिथी म्हणून किष्टय्या नारायण गड्डमवार, मेडपल्ली चे सरपंच श्री वेलादी, नीता सोमेश्वर रामटेके, यशोधरा यशवंत ढवळे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. चित्रपटाचे मुख्य निर्माता गजानन भिकाजी गेडाम व दिग्दर्शक राजेश ढवळे यांच्या नेतृत्वात सहनिर्माते चिरंजीवी किष्टय्या गड्डमवार, ज्ञानेश्वर नारायण मुठे,कुंतल खोजरे आणि मुख्य कार्यकारी निर्माता समीर रामटेके यांनी चित्रपटाच्या चमूला प्रोत्साहन दिले. तंत्रज्ञानाचे महत्त्वपूर्ण काम डी ओ पी स्मोहीत देशपांडे, ग्याफर, अनिरुद्ध वामन मुळीक आणि वी एफ एक्स विभाग मुख्य आयुष जैन, मेक अप विभाग सरिता हटवार हे सांभाळणार असून चित्रपटाच्या पहिल्या शेड्युल मध्ये अभिनेता श्रीकांत पुरमवार आणि अभिनेत्री आर्या चंकापुरे यांच्यासह विशाल पिम्पलमुडे, बन्सी खोब्रागडे, अजय अंबाडरे, सम्राट वाने, राहुल धनवंते, वरून अमरावते, राहुल गुप्ता, साक्षी मगर, संतोष कापसे,धम्मप्रकाश, अमित दुर्गे, समीक्षा ढवले, रोशनी आणि समस्त ‘गोष्ट सुरू होते’ टीमने या नव्या प्रवासाची सुरुवात केली.
गडचिरोलीत चित्रपट निर्मितीसाठी झालेले हे पहिले पाऊल म्हणजे संघर्षातून साकारलेल्या कलेचा विजय आहे. हा चित्रपट केवळ एक गोष्ट सांगणार नाही, तर तो येथील लोकांच्या जिद्दीची, स्वप्नांची आणि विशेषतः स्थानिक कलागुणांची कहाणी असेल. ‘गोष्ट सुरू होते’ ही केवळ चित्रपटाची नव्हे, तर गडचिरोलीच्या नव्या आणि उज्ज्वल भवितव्याची गोष्ट आहे! जी अस्तित्व स्टुडिओ च्या पुढाकाराणे जगापुढे येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond