'पिंजरा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
- मंत्री आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा ''पिंजरा''मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा
संध्या शांताराम


- मंत्री आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा 'पिंजरा'मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज, शनिवारी सकाळी परळ येथील राजकमल स्टुडिओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले’, असेही किरण शांताराम यांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मराठी चित्रपटसृष्टीमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून ‘पिंजरा’ ओळखला जातो. या सिनेमातील बहारदार नृत्याने अभिनेत्री संध्या शांताराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एक नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर हा सिनेमा आधारित होता. या चित्रपटातील संध्या यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली. आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते. त्यांच्या 'पिंजरा' या सिनेमासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. चंदनाची चोळी अंग जाळी या मराठी सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

संध्या शांताराम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1938 साली झाला. विजया देशमुख हे त्यांचं खरं नाव. 1959-60 च्या दशकात त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं. त्या व्ही. शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपती व्ही.शांताराम यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्यासाठीही ओळखल्या जात होत्या. झनक झनक पायल बाजे या सिनेमात 'अरे जा हट नटखट' या गाण्यात त्यांनी प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक गोपीकृष्ण महाराज यांच्याबरोबर केलेलं नृत्य सादरीकरण विशेष लोकप्रिय झालं होतं. स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा साकारून त्यांनी त्या गाण्यात नृत्य केलं. ते गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यांचा चेहरा, हावभाव आणि नृत्यावरील प्रभुत्व यामुळे त्या भारतीय सिनेमातील क्लासिकल ब्युटी आणि आर्टिस्टिक परफेक्शनचे प्रतीक ठरल्या.

चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी म्हटलं आहे की, “संध्या शांताराम म्हणजे रंग, नृत्य आणि अभिनय यांचं अप्रतिम मिश्रण होतं. त्या गेल्यानं भारतीय चित्रपटसृष्टीत एक युग संपलं.”

निधनाची बातमी अत्यंत दुःखद - आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एक्स अकाऊंटवर श्रद्धांजली वाहिली आहे. “भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!” असे त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande