जळगाव पॅटर्न’ आता राज्यभर माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा निर्णय
जळगाव, 4 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळांच्
जळगाव पॅटर्न’ आता राज्यभर माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा निर्णय


जळगाव, 4 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळांच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, शाळेशी भावनिक नाते दृढ करणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून प्रथम जळगावात राबवलेला हा नाविन्यपूर्ण प्रयोग, आता ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून राज्यभर लागू होणार आहे.मिनल करनवाल यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापनेची संकल्पना जाहीर केली होती. सध्या जळगाव जिल्ह्यात २० हून अधिक माजी विद्यार्थी संघ यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांच्या उपक्रमांमुळे शाळांच्या भौतिक सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. या यशस्वी प्रयोगामुळे शालेय शिक्षण विभागाने हा पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आदेश जारी केले आहेत.संघाची रचना: माजी विद्यार्थी संघात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि मुख्याध्यापक/प्राचार्य (सचिव म्हणून) असतील. याशिवाय एक पालक प्रतिनिधी आणि निवृत्त शिक्षक किंवा अधिकारी सल्लागार सदस्य म्हणून सहभागी होतील.मेळावे आणि स्नेहसंमेलन: प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थी मेळावा किंवा स्नेहसंमेलन आयोजित करणे बंधनकारक आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांच्या निमित्ताने हे कार्यक्रम होणार आहेत. उपक्रम: माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, शाळेचा विकास आराखडा, शिक्षक सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.माजी विद्यार्थी शाळांच्या भौतिक सुविधांच्या उभारणीत मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य करतील. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती आणि प्रेरणा देण्यावर भर असेल. तसेच, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली जाईल. यासाठी शासनाने विशेष ऑनलाइन नोंदणी प्रणाली विकसित केली असून, प्रत्येक माजी विद्यार्थ्याची नोंदणी अनिवार्य आहे. शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो आणि अहवाल या पोर्टलवर अपलोड करावे लागतील.जळगाव जिल्ह्यात मिनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने शाळांचा चेहरामोहरा बदलला आहे. हा प्रयोग आता राज्यभर राबवला जाणार असल्याने, जळगावने शालेय शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. माजी विद्यार्थी संघांमुळे शाळा आणि समाज यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande