जळगाव - जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण
जळगाव, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ. मोहित दीपक गादिया (वय २६, कनिष्ठ निवासी) यांना शुक्रवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार करण्यात आली
जळगाव - जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण


जळगाव, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ. मोहित दीपक गादिया (वय २६, कनिष्ठ निवासी) यांना शुक्रवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. भादली येथून फटाका फुटल्यामुळे जखमी झालेले चार रुग्ण (महिला व पुरुष) उपचारासाठी आले होते. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी अत्यावश्यक विभागात प्रचंड गर्दी केली होती.

डॉ. मोहित गादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना “गर्दी करू नका, बाहेर जा, आम्हाला उपचार करू द्या” असे सांगितले. याचा राग आल्याने नातेवाईकांनी डॉ. गादिया यांच्या कानशिलात लगावली. त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतर डॉक्टरांनी धाव घेऊन डॉ. गादिया यांना सोडवले. या हल्ल्यामुळे डॉ. गादिया यांच्या कानाचा पडदा फाटला असून, त्यांना काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. रात्री ११ वाजता या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande