बीड : रस्त्यांच्या भेगा, घरांच्या तड्यात वाढ; ग्रामस्थांचा वावर अजूनही वाडीतच
बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या कपिलधारवाडीत डोंगर खचू लागल्याची धोकादायक घटना समोर आली आहे. यामुळे अनेक घरांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. कपिलधारवाडीत सध्य
कपिलधारवाडी : रस्त्यांच्या भेगा, घरांच्या तड्यात वाढ; ग्रामस्थांचा वावर अजूनही वाडीतच –


बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या कपिलधारवाडीत डोंगर खचू लागल्याची धोकादायक घटना समोर आली आहे. यामुळे अनेक घरांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत.

कपिलधारवाडीत सध्या ९५ घरे व सुमारे ५०० लोकसंख्या असून गावकरी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने “पुणे जिल्ह्यातील माळीणसारखी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींची पाहणी

या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरिश धार्मिक, तहसीलदार चंद्रकांत शेळके तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर तांत्रिक समितीद्वारे भेगांची तपासणी करून कायमस्वरूपी पुनर्वसनाची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

सध्या कपिलधारवाडीतील नागरिकांना मन्मथ स्वामी देवस्थान येथे तात्पुरते स्थलांतरित करून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तरीही काही ग्रामस्थांचा वावर गावात सुरू असून कधीही दुर्घटना घडण्याचा धोका कायम आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने तातडीने दक्षता घेऊन स्थिर पुनर्वसनाची पावले उचलली नाहीत, तर मोठी मानवी हानी होऊ शकते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande