जळगाव, 4 ऑक्टोबर (हिं.स.) मित्राच्या घरच्या देवीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला १९ वर्षीय तरुण गिरणा नदीपात्रात पाय घसरून वाहून गेला. मनपाच्या अग्निशमन विभागाने तीन तास शोध मोहीम राबवली, परंतु अंधार पडल्याने शोधकार्य थांबवावे लागले आणि तरुणाचा थांगपत्ता लागला नाही. खोटे नगर परिसरातील दादावाडी मंदिरामागील मयुरेश्वर कॉलनीत राहणाऱ्या कविता संतोष पाटील, या पाळधी येथील जिल्हा बँक शाखेत कर्मचारी असून, त्या आपल्या जुळ्या मुलां हिमेश आणि हितेश यांच्यासह राहतात. हिमेश उर्फ राम संतोष पाटील (वय १९) हा कॉलनीतील तीन-चार मित्रांसह गिरणा नदीवर देवीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. नदीपात्रात उतरून हिमेशने देवीचे विसर्जन केले, परंतु त्यानंतर त्याचा पाय घसरला. त्याला पोहता येत असल्याने त्याने पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु जोरदार पाण्याचा प्रवाह आल्याने तो दमला आणि पाण्याबरोबर वाहून गेला. हिमेश वाहून गेल्याचे लक्षात येताच त्याचा मित्र आयुष महाजन याने तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे बचाव पथक, ज्यात देवीदास सुरुवाडे, संतोष तायडे, संदीप कोळी, रोहिदास चौधरी, महेश पाटील, रवींद्र भोई यांचा समावेश होता, घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सुमारे तीन तास शोधकार्य केले, परंतु अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवावी लागली. तरुणाचा शोध घेण्यासाठी पुढील प्रयत्न सुरू राहणार असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर