नांदेड, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससी मार्फत नियुक्त 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करुन आपल्या कुटूंबाचा अभिमान, जिल्ह्याचा गौरव आणि राज्याचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली.
आज कुसूम सभागृहात अनुकंपासह एमपीएससीच्या 21 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना संबंधित विभागाच्यावतीने आदेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. .
यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, विविध विभागातील नवनियुक्त उमेदवार व त्यांचे कुटूंबिय आदींची उपस्थिती होती.
उमेदवारांना शासकीय नोकरीत येण्याची संधी म्हणजे फक्त नोकरी नव्हे, तर समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. आपल्या कामातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहोचविणे आणि जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीत आपले योगदान देणे हीच खरी जबाबदारी असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून सांगितले.
अनुकंपामध्ये वर्षानुवर्षे नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आज संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील 378 उमेदवारांना आज नोकरी मिळाली असून ही आनंदाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी मानले. रोजगाराची समस्या मोठी असून, या रिक्त जागा भरल्यामुळे शासकीय कामात गतीमानता येईल. कामे प्रलंबित राहणार नाहीत. नागरिकांना तात्काळ सेवा मिळण्यास मदत होणार आहे असेही त्यांनी सांगितले. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर अडचण निर्माण होते. या शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे अनुकंपाधारकांच्या कुटूंबाना खूप फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त करुन याबाबत जिल्हा प्रशासनाचेही त्यांनी आभार मानले.
अनुकंपाची भरती प्रक्रिया खूप दिवसांपासून रखडलेली होती. अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससीच्या 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले आहेत. येणाऱ्या काळात वर्ग क व ड च्या नवनियुक्त उमेदवारांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. या भरतीमुळे शासकीय कामात गतीमानता येण्यास निश्चीतच मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये गट क अंतर्गत अनुकंपा नियुक्त 69, गट ड अंतर्गत 227, एमपीएससीकडून प्राप्त उमेदवारांची 82 अशा एकूण 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाची वितरण करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis