कमिशनखोरीतून जमिनी लाटणारे संजय राऊत हे ‘मॅन ऑफ कमिशन’ - नवनाथ बन
मुंबई, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)।कमिशनखोरीच्या धंद्यातून सर्वसामान्यांच्या जमिनी लाटणारे पगारी नेते खा. संजय राऊत हे ‘मॅन ऑफ कमिशन’ आहेत. कोणाकोणाकडून कमिशन घेऊन अलिबाग मध्ये संजय राऊत यांनी 10 प्लॉट्स खिशात घातले याचा सातबारा दाखवत भारतीय जनता पार्टीचे मा
Ban


मुंबई, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)।कमिशनखोरीच्या धंद्यातून सर्वसामान्यांच्या जमिनी लाटणारे पगारी नेते खा. संजय राऊत हे ‘मॅन ऑफ कमिशन’ आहेत. कोणाकोणाकडून कमिशन घेऊन अलिबाग मध्ये संजय राऊत यांनी 10 प्लॉट्स खिशात घातले याचा सातबारा दाखवत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी हल्लाबोल केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या विकासाचे मिशन हाती घेऊन राज्याचा कायापालट करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मॅन ऑफ मिशन’ असल्याचे ते म्हणाले. अटल सेतु, कोस्टल रोड यासारखे अनेक विकास प्रकल्प हाती घेत राज्याच्या विकासाचा आलेख देवेंद्रजी यांनी उंचावला. एकीकडे देवेंद्रजी यांची महाराष्ट्र हित आणि विकासाची दृष्टी आहे तर दुसरीकडे राऊत आणि उबाठा गटाची खंडणी आणि कमिशन वर नजर आहे या शब्दांत श्री. बन यांनी राऊत आणि उबाठा गटावर शरसंधान साधले.

बावळटपणा आणि खुळचटपणा अडीच वर्षांत कोणी केला हे जनतेला माहिती आहे असे म्हणत श्री. बन यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. बावळट मुख्यमंत्री कोण ? ही स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे यांचा पहिला क्रमांक लागेल अशी खोचक टिप्पणी करत खिल्ली उडवली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत जेमतेम अडीच दिवस मंत्रालयात जाणारे, कोवीड काळात मध्ये घरात बसून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून फुटकळ सल्ले देणारे तत्कालिन मुख्यमंत्री हे बावळटपणाचे शिलेदार आहेत असेही ते म्हणाले. याउलट देवेंद्रजींच्या निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना तीन वेळा कौल दिला आहे.

देवेंद्रजींवर श्री. राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत श्री. बन म्हणाले की देवेंद्रजी कंजुष नाहीत तर दिलदार आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी 2017 साली कर्जमाफी करणे आणि सातबारा कोरा करून शेतक-याला आधार देणे याला दिलदारपणा म्हणतात. याउलट अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील दौ-यात “माझे हात रिकामे आहेत” असे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे हे कंजुष आहेत. उद्धव यांच्या फसव्या कर्जमाफीची दमडीही मिळाली नाही असे शेतक-यांनी ठाकरे यांच्या तोंडावर सांगितले होते असेही श्री. बन यांनी नमूद केले.

दसरा मेळाव्यात शेतक-यांच्या मदतीबाबत ब्र देखील उद्धव यांनी काढला नाही

दसरा मेळाव्यात पूरग्रस्त शेतक-यांच्या मदतीबद्दल ब्र देखील काढण्याचे सौजन्य उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाकडे नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना तौक्ते वादळाच्या वेळी घोषित केलेल्या मदतीपैकी नुकसानग्रस्त शेतक-याला एक रुपयाही प्रत्यक्षात मिळाला नव्हता, असेही श्री.बन म्हणाले.

मलिदा खाण्याची परंपरा राऊत, उबाठा गटाची आहे असा प्रहार करत श्री.बन यांनी राऊतांवर पलटवार केला. कोट्यवधींचा मलिदा खाणा-यांनी 12 हजार कोटींवर बोलूच नये. मविआ सरकार असताना दररोज 100 कोटींची वसुली करत तब्बल 9.5 लाख कोटींचा मलिदा तसेच कोवीड काळात खिचडी घोटाळा करून मविआ आणि उद्धव ठाकरे यांनी मलिदा फस्त केला होता. राऊतांनी पत्राचाळीत 1500 कोटींचा मलिदा खाल्ला. उद्धव ठाकरे यांनी कोरोनामध्ये जवळच्या बिल्डरांना 12 हजार कोटींची खैरात वाटत महापालिका तिजोरीवर डल्ला मारला होता याचीही आठवण श्री.बन यांनी करून दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande