परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पालम येथे मोठ्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. समितीचे विद्यमान सभापती श्री. गजानन गणेशराव रोकडे व उपसभापती श्री. भाऊसाहेब शिवाजीराव पौळ यांच्या विरोधात संचालक मंडळाने अविश्वास ठराव दाखल केला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, परभणी येथे हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण 18 संचालकांपैकी तब्बल 13 संचालकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या करून आपला विश्वास मागे घेतल्याचे स्पष्ट झाले.
अविश्वास ठराव दाखल करताना संचालक मंडळाने सभापती व उपसभापती यांच्या कारभाराविषयी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. त्यात मासिक सभा वेळेवर न घेणे, संचालक मंडळास विश्वासात न घेता निर्णय घेणे, आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार करणे, संचालकांशी आरेरावीची भाषा वापरणे, मनमानी कारभार करणे अशा अनेक कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच 2023 मध्ये, विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पाठिंब्याने गजानन रोकडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. आमदार गुट्टे यांच्या राजकीय प्रभावामुळे बाजार समितीवर ‘काका मित्र मंडळा’चे वर्चस्व असल्याचे मानले जाते.
अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा आमदार गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील गटाने समितीवरील पकड मजबूत केली आहे. या घटनाक्रमामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात बाजार समितीमध्ये नवीन नेतृत्व उदयास येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, “या अविश्वास ठरावानंतर बाजार समितीमध्ये आमदार गुट्टे यांच्या गटाचे वर्चस्व आणखी बळकट होईल आणि समितीच्या विकासासाठी नवे प्रकल्प, निधी आणि कामे सुरु होतील. आगामी काळात पालम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकासाची गंगा वाहणार आहे,” अशी तालुक्यात चर्चा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis