पालघर, 4 ऑक्टोबर (हिं.स.) ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातील आठ गावे ‘सुंदर गाव पुरस्कारा’साठी निवडली गेली. त्यामध्ये पालघर तालुक्यातील कुरगाव हे जिल्हास्तरीय सुंदर गाव ठरले असून, या ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत ४ ऑक्टोबर आयोजित रोजगार मेळावा व सेवा पंधरवडा समारोप समारंभात हा पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक यांनी भूषविले.
कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ४० लाख आणि तालुकास्तरीय १० लाख, असे मिळून एकूण ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.
तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरिकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, मनरेगा प्रमुख अतुल पारसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकास्तरीय सुंदर गावे (१० लाख प्रत्येकी):
१. पालघर – कुरगाव
२. तलासरी – आमगाव-आच्छाड
३. वाडा – हमरापूर
४. विक्रमगड – वसुरी
५. मोखाडा – खोडाळा
६. वसई – खानिवडे
७. जव्हार – झाप
८. डहाणू – घोलवड
पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे अभिनंदन करताना म्हटले की, “या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि लोकसहभाग वाढविणारी सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल. निवड झालेली गावे इतरांसाठी आदर्श ठरतील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL