नंदुरबार, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यास जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात पाणी फाउंडेशन आयोजित “फार्मर कप स्पर्धा 2026-27” च्या पूर्वतयारीसाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात पाणी फाउंडेशनचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. हा जिल्हा नवोन्मेषी कामांसाठी सदैव तत्पर असून, येथे सामुदायिक सहभागातून आदर्श प्रकल्प उभे राहिले आहेत. संकटांचा सामना करताना समाजकारण आणि विकासकार्य यांच्यात सातत्य राखणे हेच खरी प्रगतीची दिशा आहे. पाण्याच्या कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री सदैव सकारात्मक भूमिका घेतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांना सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा सादर करताना सांगितले की, शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर प्रोत्साहनार्थ “सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. उत्कृष्ट गटशेती करणाऱ्या शेतकरी गटांमध्ये ही स्पर्धा प्रेरणादायी ठरत असून, त्यामुळे उत्पादन आणि नफ्यात वाढ होते. जैविक व शाश्वत शेतीच्या दिशेने ठोस पावले उचलली जातात. या स्पर्धेत सहभागी गटांना निवासी प्रशिक्षण, तंत्रशुद्ध शेती पद्धतींचे सखोल ज्ञान, डिजिटल शेती शाळा, विनामूल्य संवाद व मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्यविकास आणि मूल्यसाखळीतील उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जाते, असे त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या जनसेतू कक्षात आरोग्य नियंत्रण कक्ष, मूळवाट-स्थलांतरित कक्ष व तक्रार निवारण कक्ष यांचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर