नांदेड, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)।
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून मिळणारी नुकसान भरपाई ही एक आशा ठरत आहे. सध्या आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव, धर्माबाद आणि उमरी या तिन्हीही तालुक्यात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत.
या प्रयोगादरम्यान अगोदरच अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक कापणी प्रयोगावेळी कोणतीही चूक होऊ नये, वस्तुस्थितीदर्शक अहवाल कंपन्यांकडे जावा आणि अधिकाधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी खबरदारी म्हणून आमदार राजेश पवार भाजप-महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत थेट शेतात जात आहेत.
आज शनिवारी समराळा (ता. धर्माबाद) येथील शेतकरी राजेश्वर नर्सिंमलू गैनवार यांच्या शेतात पीक कापणी प्रयोगासाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पुनम पवार उपस्थित राहिल्या. शासनाने घालून दिलेल्या 5×10 मीटर क्षेत्राच्या निकषात 430 ग्रॅम इतका अत्यल्प सोयाबीन उत्पन्नाचा उतारा निघाला आहे. हीच परिस्थिती सर्वत्र आहे.
यावेळी विमा कंपनी प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आदींसह शेतकरी बांधव व भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis