रायगड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
म्हसळा तालुक्यातील रविप्रभा मित्र संस्थेच्या वतीने दसरा निमित्त ‘सन्मान नारी शक्तीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेची स्थापना होऊन यंदा १५ वर्षे पूर्ण झाल्याने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. नवरात्र व दसरा या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात खुशी कासरुंग, वैजयंती मोहिते, अरुणा जंगम व विणा विचारे या सक्षम महिलांना सन्मानपत्र, साडी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हसळा पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक्षा कानवडे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सामर्थ्याचा प्रत्यय घडवून दिला. मुलींनी ब्युटी पार्लर, नाचगाणे किंवा शिवणकाम यापलीकडे कराटे, लाठीकाठी अशा स्वरक्षणाच्या कला आत्मसात कराव्यात. त्यातून त्या सक्षम व स्वावलंबी होऊ शकतात, असे मार्गदर्शन त्यांनी केले. समाजात प्रत्येकाने स्त्रीचा आदर राखला पाहिजे, कारण ती आई, पत्नी, बहीण अशा विविध नात्यांतून समाजाचे आधारस्तंभ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी सन्मानित महिलांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान योग्य व्यक्तींना मिळाल्याने आम्हाला समाधान आहे. पुढेही असे उपक्रम राबवून समाजातील कर्तृत्वाला प्रकाशझोत देत राहू, असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, उपाध्यक्ष नरेश विचारे, उपसचिव स्वप्नील लाड, सरपंच आदित्य कासरुंग, तेजल कासरुंग यांच्यासह महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सन्मान नारी शक्तीचा’ या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाला दिलेला हा गौरव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके