रायगड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीत शाकीब पालटे यांनी स्वतः पुढे येऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. “मी हिंदू समाजाला कधीच अपशब्द वापरलेले नाहीत आणि कधी वापरणारही नाही. मी कोणत्याही समाजासाठी असे शब्द वापरलेले नाहीत. मी जे काही बोललो ते फक्त अमोल सूर्यवंशी, प्रज्ञेश खेडकर आणि श्याम कडव यांच्यासाठी होते, कारण त्यांनी आमच्या देशभक्तीवर आणि नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते,” मूळ बिल्डर हा बाजूला असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहेत असे पालटे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “ज्यांनी आम्हाला पाकिस्तानी म्हटले किंवा ‘मिनी पाकिस्तान’ असा अपमानास्पद शब्द वापरला, त्यांनाच मी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या संपूर्ण मुलाखतीकडे लक्ष दिल्यास सहज लक्षात येईल की हिंदू-मुस्लिम समाज हा नेहमीच एकोप्याने राहतो. पण ही तीन मंडळी आमच्यावर अन्याय्य ठपका ठेवतात. त्यांना मी कायदेशीर मार्गाने योग्य धडा शिकवणार आहे.”
व्हायरल मोहिमेबाबत पालटे यांनी नाराजी व्यक्त केली. “माझ्या नावाने व्हिडिओ कापून सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. तसेच मला तडीपार करण्यासाठी सह्यांची मोहीम चालवली जात आहे. मात्र मी कायद्याच्या चौकटीत राहूनच याला उत्तर देईन,” असे ते म्हणाले.
आपली भूमिका अधोरेखित करत त्यांनी हिंदू समाजाला आवाहन केले – “माझ्या व्हिडिओतील काही भाग वेगळा करून प्रसारित केला जात आहे. पण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास माझा खरा आशय लक्षात येईल. मी हिंदू बांधवांविषयी अपशब्द बोललो नाही आणि कधी बोलणारही नाही. हिंदू-मुस्लिम यांच्यातील एकोपा कायम राहावा हीच माझी इच्छा आहे.”या सविस्तर खुलाशामुळे शाकीब पालटे यांनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला असून, तरीही या विषयावर परिसरात चर्चेचे वातावरण कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके