पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्याच्या अनेक भागात शेतक-यांचे अतिवृष्टी व पूराने अतोनात नुकसान झाले आहे, या शेतक-यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतक-यांना आर्थिक मदत वितरीत करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, या नुकसानीमुळे शेतकरी संकटात आहे, राज्य सरकारच्या वतीने या बाबत नेमके काय धोरण जाहीर केले जाते, हे पाहावे लागेल. असे संकट या पूर्वी आलेले नव्हते, त्या मुळे सरकार यात नेमकी काय मदत करणार काय नुकसान भरपाई देणार हे महत्वाच असेल.
विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात पिके वाहून गेली असून शेतक-यांचे कंबरडे मोडलेले आहे, अशा स्थितीत त्यांना आर्थिक व इतर बाबतीतही दिलासा देणे गरजेचे आहे. मराठवाडा दुष्काळात असतो यंदा अतिवृष्टीच संकट आहे. सोलापूर व सातारा भागातही काही ठिकाणी नुकसान झालेले आहे.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांनाही केंद्राच्या वतीने महाराष्ट्रातील शेतक-यांना अतिरिक्त निधी व भरघोस मदतीची मागणी केली आहे. त्यांच्याकडून लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु