रत्नागिरी, 4 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूण तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या धनगर, भोई, गवळी समाजासाठी आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेतून १ कोटींचा निधी सौर ऊर्जेवरील पथतिव्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेतून कोंडमळा धनगरवाडी, कोसबी धनगरवाडी, वेहेळे भोजनेवाडी, डेरवण धनगरवाडी, सावर्डे धनगरवाडी, पोफळी एनाचे तळे, करजवाडा (१ व २), तळसर शेवरीचा दंड, कोळकेवाडी (जांभरई/वाडसाडी), मालदोली भोईवाडी, भिले भोईवाडी या वाड्यांमध्ये सौर पथदीप बसवले जाणार आहेत. या भागांतील नागरिकांना आतापर्यंत अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे धाडसाचे होते. रस्त्यांवर प्रकाशाचा अभाव, महिलांची आणि वृद्धांची सुरक्षिततेची चिंता, तसेच वन्यप्राण्यांचा सततचा धोका अशी भयावह परिस्थिती होती. पण आता हे दृश्य बदलणार आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या पथदीपांमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे, तसेच वीज बिलाचा कोणताही खर्च होणार नाही. पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-बचतीचा हा प्रकल्प गावकऱ्यांसाठी एक मोठी सोय ठरणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी