रायगड, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। म्हसळा शहरातील श्रीराम नवरात्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिशु गट, लहान गट, मोठा गट आणि संयुक्त गट या चार विभागांत एकूण ५४ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लहान मुलांपासून मोठ्या गटापर्यंत विविध ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक व्यक्तिरेखांचे अप्रतिम सादरीकरण पाहून परीक्षकांना विजेते ठरवताना चांगलीच कसरत करावी लागली.
शिशु गटात निर्विक ओक याने गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रथम क्रमांक पटकावला. विठ्ठलाची मूर्ती साकारणाऱ्या आदिश्री गव्हाणे हिला दुसरा क्रमांक, तर नरसिंह अवताराचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विरांश खुळे याला तिसरा क्रमांक मिळाला. लहान गटात छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी छावा साकारून स्वराज उद्धरकर याने प्रथम क्रमांक मिळविला. श्रीरामाच्या वेशभूषेत अनय पोतदार दुसऱ्या क्रमांकावर, तर भारत मातेच्या रूपात रिद्धी पोतदार हिने तिसरा क्रमांक पटकावला.
मोठ्या गटात गौरी पोतदार हिने बाजीप्रभु देशपांडे यांची शौर्यगाथा साकारून प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. दुसरा क्रमांक शिवशंकराच्या वेशभूषेत प्रसाद करंबे यांना मिळाला, तर आदमखोराची भूमिका साकारणाऱ्या अमोल कांबळे याला तिसरा क्रमांक मिळाला. संयुक्त गटात गोविंद बसवत व शक्ती बसवत या जोडीने भिल्ल जंगलातील राजाराणी साकारून प्रथम क्रमांक पटकावला. अनुज पोतदार व गटाने श्रीकृष्ण-अर्जुनाची वेषभूषा साकारून दुसरा क्रमांक मिळविला, तर आर्य करडे, ओम करडे आणि शंतनु शिपुरकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन साकारून तिसरा क्रमांक मिळविला.
याशिवाय स्वरा हेगिष्टये व स्वराज बनकर या गटाने मनोज जरांगे मराठा आंदोलन या सामाजिक विषयावर साकारलेली वेषभूषा अनेकांचे लक्ष वेधून घेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा दिवसांचे नवरात्र कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मंडळ सदस्यांचा देखील मंडळाचे अध्यक्ष सौरव पोतदार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, मंडळाचे अध्यक्ष सौरव पोतदार, उपाध्यक्ष महेंद्र करडे, शिरीष समेळ, शैलेश पटेल, योगेश करडे, हिंदू ग्रामस्थ अध्यक्ष समीर बनकर, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके